अजय पुरकरचे छोट्या पडद्यावर पुनरागमन, नशीबवान मालिकेत खलभूमिका

अजय पुरकर हे नाव म्हणजे मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व. त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. अनेक वर्षं दमदार चित्रपट केल्या नंतर आता पुन्हा ते छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत, स्टार प्रवाहवरील आगामी नशीबवान मालिकेतून. गेल्या काही वर्षांपासून दमदार कथा आणि दर्जेदार मालिकांमुळे स्टार प्रवाह चॅनलने प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. आता हेच चॅनल एका नव्या मालिकेद्वारे प्रेक्षकांसाठी वेगळा विषय घेऊन येत आहे. ‘नशीबवान’ ही मालिका लवकरच सुरू होत आहे. या मालिकेत गिरीजा नावाच्या मुलीची कहाणी आहे, जिने लहानपणापासून अनेक संकटांचा सामना केला आहे — पालकांचे प्रेम न मिळणे, लहान वयात घराची जबाबदारी स्वीकारणे आणि जगण्यासाठीची झुंज. मात्र, या संघर्षमय प्रवासात गिरीजाला आपलं नशीब उजळल्याचं समजतं. ती ‘नशिबवान’ कशी होते, याची रोचक गोष्ट या मालिकेत मांडली जाणार आहे.

https://www.instagram.com/reel/DNJE4M0ywHF/?igsh=NjlsZjhyODhwemk1

या मालिकेत प्रसिद्ध अभिनेते अजय पुरकर खलनायक नागेश्वर घोरपडे यांची भूमिका साकारणार आहेत. पैशाच्या जोरावर साध्या माणसांना त्रास देणारा, निर्दयीपणे वागताना कोणताही गुन्हा करण्यास मागेपुढे न पाहणारा आणि तरीही कायद्याच्या जाळ्यात न अडकणारा अशी ही व्यक्तिरेखा आहे. या भूमिकेबद्दल अजय पुरकर सांगतात, “सहा वर्षांनंतर मालिकेत काम करत आहे. ही भूमिका ऐकताच मला ती आवडली. स्टार प्रवाहसारख्या नंबर वन चॅनलसोबत आणि कोठारे व्हिजनसारख्या निर्मिती संस्थेसोबत काम करण्याची ही उत्तम संधी आहे. महेश कोठारे यांच्यासोबत काम करण्याचं स्वप्न या मालिकेमुळे पूर्ण होत आहे. नागेश्वरची भूमिका अनेक स्तरांनी भरलेली आहे आणि कथा त्याभोवती फिरणार आहे. इतक्या प्रभावी खलनायकाची भूमिका मी यापूर्वी केली नाही, त्यामुळे प्रेक्षकांना नक्कीच वेगळा अनुभव मिळेल.”