‘We can, We shall overcome’ ये युद्ध हम ही जितेंगे’

कोरोना संकटातून आपण नक्कीच बाहेर पडू हा विश्वास देणारं नवीन गाणं महेश मांजरेकर यांच्या संकल्पनेतून जन्माला आलं आहे.

कोरोनामुळे सगळं जग सध्या ठप्प झालेलं असलं तरी डॉक्टर्स, मेडिकल स्टाफ, पोलिस कर्मचारी, महापालिका कर्मचारी, सफाई कामगार, अत्यावश्यक सेवा पुरवठादार… हे अहोरात्र मेहनत करुन, जीव धोक्यात घालून आपल्यासाठी काम करतायत. अशा ‘कोविड वॉरियर्स’ना हे गाणं समर्पित करण्यात आलंय.

असंख्य चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन करणाऱ्या महेश मांजरेकर यांनी या गाण्यातून पहिल्यांदाच गीतलेखन केलेलं आहे. अभिषेक नेलवाल, शैली बिडवईकर आणि हितेश मोडक यांनी गायलेल्या या गाण्याला संगीत आहे हितेश मोडक यांचं.

महेश मांजरेकर यांचं कुटुंब, मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक आघाडीचे कलाकार आणि नामवंत खेळाडू या गाण्यात दिसतील. यात विशेष उल्लेख करावा लागेल तो सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील तसंच पृथ्वी शॉ आणि श्रेयस अय्यर या आजी-माजी क्रिकेटपटूंचा…

या सर्वांनी अर्थातच आपापल्या घरातून व्हिडीओ शूट केलेला आहे, आणि जस्ट राईट स्टुडिओज़च्या मनीष मोरे यांनी Music Video एडिट केलाय.

याच लॉकडाऊनच्या काळात महेश मांजरेकर यांनी घरीच राहणं कसं गरजेचं आहे हे सांगणारी एक शॉर्टफिल्मही घरच्या घरीच बनवली होती. शॉर्टफिल्मला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर त्यांना म्युझिक व्हिडीओची कल्पना सुचली. त्यांनी गाणं कागदावर उतरवलं आणि संगीतबद्ध झालेलं गाणं ऐकवल्यावर विविध क्षेत्रातील त्यांच्या मित्रांनी ही कल्पना उचलून धरली. महेश मांजरेकर यांचं पूर्ण कुटुंब या व्हिडीओत तुम्हाला भेटणार आहेच पण त्याबरोबरच विद्युत जमवाल, अभिमन्यू दासानी, पूजा सावंत, शिवाजी साटम, प्रवीण तरडे, सचिन खेडेकर, हेमल इंगळे असे सितारे आणि क्रिकेटचं मैदान गाजवणारे महारथी हे या गाण्यातून तुमच्या भेटीला येत आहेत. सारस्वत बॅंकेनं हे गाणं प्रस्तुत केलं आहे.

सध्या आपण सगळे आपापल्या घरात बंदिस्त आहोत. भविष्याच्या चिंतेने हळूहळू सर्वांनाच उदासवाणं वाटू लागलंय. लॉकडाऊनला पन्नास दिवस उलटून गेलेत आणि या दिवसात कोरोनाशी खऱ्या अर्थाने सामना करतायत ते ‘कोविड वॉरियर्स’… त्यांच्या हिंमतीला सलाम करण्यासाठी आणि घरात बसून चिंताग्रस्त असलेल्या जनतेचं मनोधैर्य उंचावण्यासाठी या गाण्याची कल्पना मला सुचली. यापूर्वीही अनेक संकटांचा मुकाबला आपण केलेला आहे, तसंच या कोरोनाच्या विळख्यातून आपण बाहेर पडणारच हा विश्वास जागवणारं हे गाणं आहे. अशा प्रकल्पांसाठी आजवर सारस्वत बॅंकेनं नेहमीच मला साथ दिली आहे. या गाण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानासाठी मी सारस्वत बॅंकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांचे मनापासून आभार मानतो.

– महेश मांजरेकर