“अमृता पवार साकारणार सोनी मराठी वरील जिजामाता”
स्वराज्याचा रक्षणकर्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवबांच्या जडण-घडणीत सगळ्यात मोठा वाटा राजमाता जिजाऊंचा होता. जिथे-जिथे स्वराज्याबद्दल बोललं जातं तिथे-तिथे या रयतेच्याराजाचा उल्लेख हा होतोच. आपली लढाई लढण्याचं बळ ज्या माऊलीमुळे शिवबाच्या पखांमध्ये आलं ती जिजाऊ. शिवबा ते छत्रपती शिवाजी महाराज हा लढवय्या घडवणाऱ्या त्या माऊलीचा याप्रवासात मोलाचा वाटा होता. याच माऊलीच्या कर्तृत्त्वाला सलाम करत सोनी मराठी स्वराज्य जननी जिजामाता च्या निमित्ताने या वीरमातेची जीवनगाथा प्रेक्षकांसमोर मांडणार आहे.
वेगवेगळ्या विषयांवर मालिका सादर करणारी सोनी मराठी ही वाहिनी येत्या १९ ऑगस्ट पासून या राजमातेचा जीवनप्रवास प्रेक्षकांसमोर आणणार आहे. या मालिकेची छोटीशी झलक टीझरस्वरूपात नुकतीच सोनी मराठीवर झळकली. ऐतिहासिक मालिकांची उत्सुकता महाराष्ट्रात नेहमीच पाहायला मिळाली आहे. याच पठडीतली जिजाऊंचं कर्तृत्त्व सांगणारी मालिका आता सोनीमराठीवर येणार आहे. डॉ. अमोल कोल्हे यांचं जगदंब क्रिएशन्स यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे.तेव्हा अमोल कोल्हे आणि ऐतिहासिक मालिका, नाटकं हे समीकरण पुन्हा एकदा स्वराज्यजननी जिजामाता च्या निमित्ताने प्रेक्षक पाहू शकणार आहेत.
या मालिकेतून स्वराज्याच्या या जननीचा संपूर्ण प्रवास उलगडणार आहे. सोनी मराठीवर सादर होणाऱ्या या स्वराज्य जननीच्या रूपात अमृता पवार ही अभिनेत्री दिसणार आहे. तेव्हा स्वराज्य जननीजिजामाताच्या भूमिकेतून अमृता पवार हिच्या अभिनयाचा नवा पैलू पाहणं, औत्सुक्याचं ठरणार आहे.
“स्वराज्यजननी जिजामाता” ही जगदंब creations ची दुसरी निर्मिती. स्वराज्यरक्षक संभाजी नंतर पुन्हा एक वेगळं शिवधनुष्य पेलण्याचं आव्हान आहे !
शहाजीराजांची स्वराज्यसंकल्पना ज्यांनी जपली, जोपासली आणि स्वराज्यसंस्थापक शिवरायांना घडवलं त्या जिजाऊ मासाहेबांचं जीवनचरित्र प्रेक्षकांसमोर आणणं सोनी मराठी च्या माध्यमातून शक्य होत आहे ही आनंदाची बाब आहे आणि तितकीच जबाबदारीचीही ! मालिका केवळ मनोरंजन नाही तर संस्कार असेल आणि तमाम जिजाऊंच्या लेकींसाठी अभिमानाचा हुंकार असेल !- डॉ. अमोल कोल्हे.”