अभिनेता आयुष संजीवचं सगळ्यांना थिरकायला लावणारं धडाकेबाज गाणं प्रदर्शित : ‘हळद लागणार भावाला’

Aayush Sanjeev

आपल्या नैसर्गिक अभिनयाने फार कमी काळातच प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण केलेल्या चॉकलेट हिरो आयुष संजीवचं नवं कोरं गाणं हळद लागणार भावाला नुकतच प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. हे गाणं सप्तसूर म्युझिक या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित झालं असून हे गाणं नागेश मोर्वेकर आणि हृषी बी यांनी गायलं आहे. हृषी बी यांचे संगीत आहे आणि कृतिक मजिरे यांनी दिग्दर्शन केले आहे. साईनाथ राजाध्यक्ष आणि बीना राजाध्यक्ष यांनी निर्मिती केली आहे. आयुष संजीव बरोबरच या गाण्यात वेदांत महेवार, सुचिता चाटे, आदित्य झा देखील झळकत आहेत.

Aayush Sanjeev

आयुष संजीवला या गाण्याचा अनुभव विचारला असता तो सांगतो, “हळद लागणार भावाला हे गाणं माझ्यासाठी खूप विशेष आहे. या गाण्यातून मला माझ्या मनासारखं नृत्य सादर करता आलं. आपल्याकडे मराठी भाषेत फार उत्तम गाणी बनतात पण डान्स नंबर खूप कमी आहेत. लावणी किव्वा झिंगाट सारखी फ्री स्टाईल नृत्याची गाणी आहेत पण मला असं लक्षात आलं की मुळात डान्स नंबर आणि त्यात नृत्य करणारे पुरुष कलाकार कमी आहेत. मला हे बदलायचे आहे. हळद लागणार भावाला हे आपल्या इथलं अशा पद्धतीचं पहिलं असं गाणं आहे जे पूर्णपणे डान्स नंबर आहे. बरेचदा असं होतं की डान्स नंबरला प्रतिक्रिया अशा येतात की हे दाक्षिणात्य वाटतं, किंवा त्या पद्धतीचं नृत्य आहे. माझी इच्छा आहे की ते बदलून लोकांना असे वाटले पाहिजे की अरे हे तर मराठी वाटतयं. आपल्याकडचे डान्स नंबर तितके प्रचलित व्हावेत आणि या गाण्यामुळे त्यांचा ट्रेण्ड यावा अशी माझी फार इच्छा आहे. आज वर प्रेक्षकांनी माझ्या प्रत्येक भूमिकेला भरभरून प्रेम दिले आहे. ते या ही वेळी गाणं प्रदर्शित झाल्या पासून त्यांची पसंती दर्शवतायेत आणि त्या साठी मी खरंच सगळ्यांचा खूप आभारी आहे. रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच मला नवनवीन आणि वेगवेगळी कामं करण्याचे प्रोत्साहन आणि ऊर्जा मिळते.” 

अभिनेता आयुष संजीवने आपल्या नैसर्गिक अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या हृदयात आपली खास जागा निर्माण केली आहे. सोनी मराठीवरील बॉस माझी लाडाची आणि झी मराठीवरील 36 गुणी जोडी यांसारख्या त्याच्या मालिकांमुळे तो फार कमी वेळात सर्वांचा लाडका अभिनेता बनला आहे. फार कमी लोकांना ही गोष्ट माहिती आहे की आयुष संजीवकडे उत्तम नृत्य कौशल्य असून त्याने त्याच्या करिअरची सुरुवात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून केली होती. जिथून तो पुढे अभिनयाकडे वळला. हळद लागणार भावाला हे गाणं सगळ्यांनाच थिरकायला लावणारं आहे. स्वतः आयुष संजीवने या गाण्यात उत्तम नृत्यप्रदर्शन करून प्रेक्षकांना पुन्हा एकदा भुरळ घातली आहे. हळद लागणार भावालाच्या निमित्ताने प्रेक्षकांना आयुषची एक वेगळीच छटा पाहायला मिळत आहे.

Aayush Sanjeev

आयुष संजीव चे हळद लागणार भावाला हे गीत त्याच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीच ठरत आहे आणि ते त्याच्या ह्या गाण्याला भरभरून प्रतिसाद देत आहेत. अनेक प्रेक्षकांनी आयुषला अधिकाधिक डान्स नंबर्स मध्ये पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आयुषच्या या गाण्यामुळे त्याच्या लोकप्रियतेत निश्चितच वाढ झाली आहे.

 

Aayush Sanjeev