दिपक देऊळकर आणि निशिगंधा वाड यांचा छोट्या पडद्यावर ‘श्री गुरुदेव दत्त’ मालिकेच्या निमित्ताने कमबॅक

Nishigandha Waad To Comeback With Shree Gurudev Datta
दिपक देऊळकर आणि निशिगंधा वाड यांचं छोट्या पडद्यावर कमबॅक स्टार प्रवाहवरील ‘श्री गुरुदेव दत्त’ मालिकेच्या निर्मितीची सांभाळणार धुरा

मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी अर्थातच दिपक देऊळकर आणि निशिगंधा वाड छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करायला सज्ज आहेत. स्टार प्रवाह वर १७ जूनपासून सुरु होणाऱ्या श्री गुरुदेव दत्त या मालिकेच्या निर्मात्यांच्या रुपात हे दोघं प्रेक्षकांना भेटणार आहेत. १७ जूनपासून सायंकाळी साडेसात वाजता ही मालिका ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. दत्तसंप्रदाय खूप मोठा आहे. अगदी श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थांपासून ते अगदी शंकर महाराजांपर्यंत. अवतार अनेक असले तरी मूळ मात्र एकच. त्याच मूळ अवताराची कथा म्हणजे ‘श्री गुरुदेव दत्त’ ही मालिका. दत्तगुरुंचा जन्म कसा झाला ? बालपणीच्या त्यांच्या अगाध लीला आणि माता अनुसुये सोबतचं त्यांचं नातं मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न या निमित्ताने करण्यात येणार आहे.

श्री दत्त अवताराचा उगम आणि प्रवास अद्भुत आहे. श्री दत्तात्रेय अवतार हा उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही स्थितींचा निर्देशक आहे. तसंच तो त्रिगुणात्मक म्हणजे सत्त्व, रज आणि तम या तिन्ही गुणांनी युक्त आहे. म्हणूनच ‘त्रिगुणात्मक त्रिमूर्ती श्रीदत्त’ असं पुराणांमध्ये दत्तगुरुंचं वर्णन केलं जातं. निर्गुण आणि निराकार अशा ब्रम्ह तत्त्वाची अनुभूती जो करून देतो तो गुरू. संपूर्ण विश्वाचे गुरूपद श्रीदत्तात्रेयांना बहाल केले गेले आहे. दत्तगुरुंच्या अवताराची ही गोष्ट मालिकेतून पाहायला मिळणं म्हणजे प्रेक्षकांसाठी एक सुखद अनुभव नक्कीच असेल.

या भव्यदिव्य मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाह चे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘इतक्या महान अवताराची कथा सांगताना गर्व, अभिमान आणि आनंद वाटतोय. ब्रम्हा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा मिळून एक अवतार जन्मला ते म्हणजे दत्तगुरु. दत्तगुरुंच्या अवताराची जन्मापासूनची गोष्ट या मालिकेत पाहायला मिळेल. अत्री ऋषी आणि माता अनुसूयेच्या पोटी जन्माला येण्यापासून ते अगदी आजही त्यांच्या महात्म्याची वेळोवेळी प्रचिती देणारी अद्भुत कथा सादर करण्याचा ‘स्टार प्रवाह’ वाहिनीचा प्रयत्न असेल. अध्यात्म आणि अप्रतिम व्हिज्युअल इफेक्ट्स याची उत्तम सांगड या मालिकेत दिसेल.

या मालिकेच्या लेखनाची जबाबदारी असेल स्वामी बाळ यांच्याकडे. पौराणिक काळ जिवंत करणारा भव्यदिव्य सेट या मालिकेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणता येईल. त्यासाठी पाहायला विसरु नका ‘श्री गुरुदेव दत्त’ ही नवी मालिका १७ जूनपासून सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाह वर.

 

Nishigandha Waad To Comeback With Shree Gurudev Datta

Nishigandha Waad To Comeback With Shree Gurudev Datta