सुन्न करणारा आणि जीवनाचं अंतिम सत्य सांगणारा एक नवीन दीर्घांक आपल्यासमोर येत आहे – “घोर”. दिग्दर्शक आयुष आशिष भिडे आणि लेखिका नीरजा अविनाश वर्तक यांनी एकत्र येऊन प्रेक्षकांसमोर ही कलाकृती सादर करण्याचे ठरवले आणि आता हे नाटक रंगमंचावर येण्यासाठी सज्ज आहे. लिखाण, दिग्दर्शन, अभिनय अशा सर्वच पातळ्यांवर सक्षम ठरणारा हा दीर्घांक आहे. दीर्घांकातील गूढता प्रेक्षकांना खिळवून ठेवेल यात शंका नाही.
दीर्घांकाचा दिग्दर्शक आयुष भिडे याने यापूर्वी अनेक मालिका तसेच नाटकांमधे काम करत पारितोषिके पटकावली आहेत. सध्या स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत लकी ची भूमिका साकारणारा आयुष भिडे यात अघोरी या भूमिकेतून आपल्या भेटीस येणार आहे. त्याच बरोबर नीरजा वर्तक आणि सायली गावंड यांच्याही भूमिका महत्त्वाच्या आहेत त्याच बरोबर त्यांचे सादरीकरण ही तितकेच कौतुकास्पद आहे. कलाकारांचा अभिनय तसेच दीर्घांकाची तांत्रिक बाजूही तितकीच भक्कम असल्याने दीर्घांक अधिकाधिक दर्जेदार ठरत जातो. कैलास ठाकूर यांची प्रकाशयोजना, मिहीर जोग यांचे पार्श्वसंगीत, शुभम जाधव यांचे नेपथ्य, शरद विचारेंची रंगभूषा यांची उत्तम साथ दीर्घांकाला मिळते. तसेच कैलास मेस्त्री, यश जाधव, पूर्वा फडके आणि समूहातील इतर सहकाऱ्यांची साथ असल्याने एकुणच दीर्घांकाची पडद्यामागची बाजूही व्यवस्थित सांभाळली जाते. चिता, पेट घेणाऱ्या चितेचा आवाज, आसमंतात भरून राहिलेला धूर सगळंच चांगल्या अर्थाने अस्वस्थ करणारं ठरू शकेल.
मालिकांमधून अभिनय करून प्रेक्षकांची मनं जिंकत असताना दिग्दर्शक म्हणून नाटकाच्या अनुभवा विषयी विचारले असता दिग्दर्शक आयुष भिडेने सांगितले की, “घोर हे नाटक माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मी या पूर्वीही दिग्दर्शन केले आहे पण यावेळी नाटकाचा विषय आणि त्याच्या छटा या अधिक रोचक आहेत. मी सध्या स्टार प्रवाह वरील प्रेमाची गोष्ट या मालिकेत लकी हे खेळकर पात्र साकारत आहे. अशातच घोर सारखं एक वेगळं नाटक करायला मिळणं ही माझ्यातील कलाकारासाठी पर्वणीच आहे. हा मुळात दीर्घांक असल्याने प्रेक्षकांसमोर ते सादर करणं त्या विषयी अधिक उत्सुकता आहे. नाटकाच्या कथे बाबत आणि मांडणी बद्दल सांगायच झालंच तर मी आणि माझ्या समूहातील कलाकार जसजसं काम करत गेलो तशा एक एक गोष्टी सुचत गेल्या. प्रेक्षकांनी नेहमीच माझ्या सगळ्याच कामांवर भरभरून प्रेम केले आहे, मला खात्री आहे की यावेळी या कलाकृतीला ही ते चांगला प्रतिसाद देतील.”
आयुषच्या प्रेमाची गोष्ट मालिकेतील लकी या पात्राला प्रेक्षक भरभरून पसंती देत आहेत. या मालिकेत राज हंचनाळे आणि तेजश्री प्रधान सोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे हे आयुषला विचारले असता त्याने सांगितले की, “तेजश्री सोबत काम करताना खूप मजा येतेय. ती मालिकेत माझी वहिनी आहे. पडद्यावर तिच्यासोबत वहिनी आणि दिराच्या मैत्रीपूर्ण नात्याचे अनेक पैलू उलगडत आहेत. तसेच, राज बरोबर भावाची भूमिका साकारत असताना त्यात ही अनेक गमतीजमती असतात, भावंडांमधील खेळीमेळीचं वातावरण असतं. अनेक प्रेक्षकांनी मला हे ही सांगितलं आहे की आम्ही खरे भाऊ दिसतो.”
घोर या दीर्घांकाचा शुभारंभाचा प्रयोग ७ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता प्रबोधनकार ठाकरे लघु नाट्यगृहात पार पडणार आहे. मुख्य म्हणजे हा प्रयोग हाऊसफुल्ल झालेला आहे. यापुढेही “घोर” चे बरेच प्रयोग होतील अशी आशा आहे. घोरच्या संपूर्ण समूहाला खूप शुभेच्छा.