भूमिकेसाठी कायपण! मालिकेतलं महत्त्वपूर्ण वळण साकारण्यासाठी आनंदी बनणार जिवंत शिल्प
स्टार प्रवाहवरील आनंदी मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. मालिकेतील रंजक कथानक आणि अनपेक्षित वळणांमुळे प्रेक्षकांची उत्सुकता कायम वाढत आहे. लवकरच मालिकेत एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि थरारक वळण पाहायला मिळणार आहे, ज्यासाठी आनंदी बनणार आहे जिवंत शिल्प.
पॅरिसहून आलेल्या महत्त्वाच्या पाहुण्यांसाठी युगंधरने खास भेटवस्तू म्हणून एक दुर्मिळ आणि आकर्षक मूर्ती आणली होती. मात्र, अनावधानाने आनंदीच्या हातून ती मूर्ती फुटते. या घटनेमुळे युगंधरची पाहुण्यांसमोर मानहानी होऊ नये आणि त्याच्या व्यवसायावर परिणाम होऊ नये म्हणून आनंदी एक धाडसी पाऊल उचलते. फुटलेल्या मूर्तीच्या जागी ती स्वतःच उभी राहण्याचा निर्णय घेते.
मालिकेतील हा प्रसंग जितका आगळावेगळा आहे, तितकीच मेहनत तो पडद्यावर साकारण्यासाठी घेण्यात आली आहे. आनंदीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जाई खांडेकर हिला हुबेहुब जिवंत शिल्पाचा लूक देण्यासाठी तब्बल चार तासांची मेहनत घेण्यात आली. त्वचेला कोणताही त्रास होऊ नये यासाठी त्वचारोगतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार विशेष प्रकारचे स्किन-फ्रेंडली रंग वापरण्यात आले. मेकअप, वेशभूषा आणि बॉडी पेंटिंगच्या मदतीने जाईला जिवंत शिल्पासारखं वास्तववादी रूप देण्यात आलं. आनंदीच्या संपूर्ण टीमने यासाठी प्रचंड मेहनत घेतली.
या अनुभवाविषयी सांगताना अभिनेत्री जाई खांडेकर म्हणाली, ‘मालिकेत मी आजवर अनेक वेगवेगळे प्रसंग साकारले आहेत, पण जिवंत शिल्प बनण्याचा हा अनुभव खूपच वेगळा आणि आव्हानात्मक होता. जवळपास चार तास एकाच जागी बसून मेकअप करावा लागला. त्यानंतर शूटिंगदरम्यान बराच वेळ स्थिर उभं राहण्याची कसरतही होती. हा प्रसंग साकारणं कठीण होतं. मात्र प्रेक्षकांना काहीतरी वेगळं पाहायला मिळणार आहे याचा आनंद आहे. कलाकार म्हणून अशा आव्हानात्मक गोष्टी साकारायला मिळत आहेत याचा आनंद आहे.
आनंदीचं हे अनोखं जिवंत शिल्पाचं रूप आणि तिचा त्याग युगंधरचा मान राखण्यात यशस्वी ठरेल का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. त्यासाठी नक्की पहा आनंदी रात्री ९.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.






