नात्यांचा हळवा प्रवास उलगडणार नव्या मालिकेत
स्टार प्रवाह वाहिनी पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी एक भावस्पर्शी कौटुंबिक मालिका घेऊन येत आहे. ‘सुना येती घरा’ असं या नव्या मालिकेचं नाव असून, नाती, कुटुंब, प्रेम, संघर्ष आणि आपलेपणाचा सुंदर मिलाफ या मालिकेत पाहायला मिळणार आहे. दोन कुटुंबांमधील भावनिक संघर्ष आणि नव्या नात्यांमुळे घडणारे बदल या मालिकेच्या माध्यमातून उलगडणार आहेत.
‘सुना येती घरा’ ही कथा आहे शिवनाथ आणि शिरोळे पाटील कुटुंबांची. एका प्रेमविवाहामुळे दोन कुटुंबांमध्ये निर्माण झालेला दुरावा आणि त्यातून घेतले गेलेले कठोर निर्णय ही मालिकेची मुख्य पार्श्वभूमी आहे. आपल्या मुलांनी प्रेमविवाह न करता आई-वडिलांच्या पसंतीनेच लग्न करावं, असा नियम घरात ठरवला जातो. मात्र, काळ बदलतो तसं नात्यांचं गणितही बदलत जातं. घरात नव्या सुना आल्यानंतर आनंद आणि समृद्धी येते की नात्यांमध्ये आणखी दुरावा निर्माण होतो, हे मालिकेत पाहायला मिळणार आहे.
या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते अशोक शिंदे, लोकप्रिय अभिनेत्री दीपा परब आणि अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. कौटुंबिक नात्यांवर आधारित ही मालिका प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भिडेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.
मालिकेविषयी बोलताना स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, “सासू, सासरे, सुना आणि मुलांना एकत्र बांधून ठेवणारी ही गोष्ट प्रेक्षकांना नक्की आवडेल. एका घरात तीन सुना आल्यावर कथेची गंमत आणखी वाढणार आहे. परस्पर नातेसंबंधांवर भाष्य करणारी ही मालिका हृदयस्पर्शी ठरेल.”
अभिनेते अशोक शिंदे या मालिकेत शिवनाथ ही भूमिका साकारणार आहेत. आपल्या भूमिकेविषयी बोलताना ते म्हणाले, “स्टार प्रवाहसोबतची ही माझी नववी मालिका आहे. पुन्हा या कुटुंबाचा भाग होताना खूप आनंद होत आहे. शिवनाथ हा माणसं जपणारा आणि कुटुंबावर जीवापाड प्रेम करणारा व्यक्ती आहे. आपल्या मुलांनी योग्य मार्गावर चालावं म्हणून तो कधी कठोर होतो, पण त्यामागे कायम प्रेम आणि काळजी असते. भावनिक संघर्षातून जाणारी ही कथा प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडेल.”
दीपा परब छोट्या ब्रेकनंतर पुन्हा मालिकाविश्वात कमबॅक करत आहेत. स्टार प्रवाहसोबतची त्यांची ही पहिलीच मालिका आहे. उमावती या भूमिकेबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “मालिकेची कथा आणि माझं पात्र ऐकताक्षणीच मला खूप भावलं. उमावती स्वभावाने प्रेमळ, मायाळू आणि कुटुंबाला जोडून ठेवणारी स्त्री आहे. वडील आणि मुलांमधला संवेदनशील दुवा म्हणून ती स्वतःकडे पाहते. प्रेक्षकांनाही या मालिकेत स्वतःचं घर आणि नात्यांचं भावविश्व दिसेल.”
तर अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत पुन्हा एकदा खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्या म्हणाल्या, “पद्मावती या पात्राचा एक वेगळाच दरारा आहे. कपटीपणा हा तिचा स्थायी स्वभाव आहे. स्वतःची श्रीमंती सगळ्यांना दिसलीच पाहिजे, हा तिचा हट्ट असतो. जवळपास तीन वर्षांनंतर पुन्हा मालिका करत असल्यामुळे खूप उत्सुकता आहे.”
नात्यांची गुंतागुंत, भावनिक संघर्ष आणि कुटुंबातील प्रेमाचा हळवा प्रवास अनुभवण्यासाठी ‘सुना येती घरा’ ही मालिका लवकरच स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Keywords : Suna Yeti Ghara Star Pravah’s New Serial, Suna Yeti Ghara, Ashok Shinde, Sharmishtha Raut, Deepa Parab Chaudhari, Marathi Serial, Marathi Show, Star Pravah







