वर्षा उसगांवकरांनी घेतला ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा निरोप; बाहेर पडताच म्हणाल्या,”सगळी स्वप्न…”

Varsha Usgaonkar Evicted From Bigg Boss Marathi 5

‘बिग बॉस मराठी’चा खेळ आता अंतिम टप्प्यावर आला आहे. लवकरच हा खेळ प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मिड वीक एव्हिक्शन पार पडलं असून महाराष्ट्राच्या लाडक्या वर्षा ताईंनी या घराचा निरोप घेतला आहे. वर्षा ताई जिंकाव्या अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा होती. पण कुठेतरी त्यांचा खेळ कमी पडला. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील कोणाचा प्रवास संपणार याकडे प्रेक्षकांचं आता लक्ष लागलं होतं. वर्षा उसगांवकर, अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर, अंकिता प्रभू – वालावलकर, धनंजय पोवार आणि सूरज चव्हाण यांच्यापैकी एका सदस्याचा प्रवास संपणार होता.

‘बिग बॉस मराठी’च्या घराचा निरोप घेतल्यानंतर वर्षा ताई म्हणाल्या,”मला असं वाटलं होतं की मी रेडकार्पेटवर जाईन. फायनलिस्टमध्ये असेन. पण शेवटी जनतेची इच्छा नियतीची इच्छा असते. आज मी घराचा निरोप घेत आहे हे माझ्यासाठी खूप धक्कादायक आहे. शेवटपर्यंत राहण्याची माझी इच्छा होती… पण हरकत नाही. सगळी स्वप्न आपल्या मनाप्रमाणे पूर्ण होत नाहीत. हा खेळ खेळण्याचं मी धाडस दाखवलं”.

‘बिग बॉस मराठी’च्या घरातून बाहेर पडल्या नंतर वर्षा ताईंनी आपल्या चाहत्यांसाठी आपल्या सोशल मिडीया वर एक खास पोस्ट शेअर केली आहे. “प्रवास हा केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा नाही, तर स्वतःला शोधण्याचा आहे.😇
आणि मी #BiggBoss च्या प्रवासात केवळ स्वतःला नव्याने ओळखले नाही, तर मी आपले सामर्थ्य, धैर्य आणि संघर्ष यांचा अनुभव घेतला. या प्रवासात मी अनेक आव्हानांचा सामना केला, नवीन मित्र बनवले आणि माझ्या सच्च्या व्यक्तिमत्त्वाला वाव दिला. माझा हा अनुभव दर्शवतो की प्रत्येक प्रवास आपल्याला एक नवीन शिकवण देतो आणि आपल्याला अधिक बलवान बनवतो.✨

Thank you to the whole team of @bbmarathi @endemolshineind @colorsmarathi & @officialjiocinema

तुमची ताई, तुमची वर्षा, तुमची #WonderGirl या शो मधुन तुमचा निरोप घेत आहे… पण मनोरंजनाचा हा घेतलेला वसा कायम पुढे चालत राहील…!🙏🏻✨ माझ्या प्रिय प्रेक्षकांना…. प्रेम आणि फक्त प्रेम..!❤️”

वर्षा ताई घराबाहेर पडताना त्यांनी घरातील इतर सदस्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ गाजवणाऱ्या 90 च्या दशकातील महानायिका वर्षा उसगांवकर या ‘बिग बॉस मराठी’च्या घरात जाणाऱ्या पहिल्या सदस्य ठरल्या होत्या. स्वप्नसुंदरी, महिलांची लाडकी स्टाईल आयकॉन आणि ड्रीमगर्ल अशी वर्षा उसगांवकर यांची ओळख. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातही त्यांनी आपल्या प्रभावी मराठी भाषेने, आणि आपल्या हटके स्टाईलने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं.

‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9.30 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर.