स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय काय करु शकता? असं प्रश्न जर कुणाला विचारला तर भन्नाट उत्तर मिळतील. स्वप्न पूर्ण करण्याच्या वेडापायी आयुष्य झोकून दिलेल्या मनस्वी व्यक्ती आपल्या आजूबाजूला हमखास असतात. आज ज्याच्याबद्दल बोलणार आहोत त्याची लाईफ स्टोरीही याला अपवाद नाही. ‘स्टार प्रवाह’वर नुकत्याच सुरु झालेल्या ‘साता जल्माच्या गाठी’ या मालिकेतील युवराज म्हणजेच विशाल निकमला सध्या प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळतंय. विशालचा अभिनयाचा प्रवास मात्र वाटतो तितका सोपा नाही. मुळचा सांगलीकर असणाऱ्या विशालला लहानपणापासूनच अभिनयाचं वेड होतं. वडिल शेतकरी, घरात कुणीही अभिनय क्षेत्रात नाही. अश्या परिस्थीतीतही विशालने आपला हट्ट सोडला नाही. मास्टर इन फिजिक्सची पदवी आणि सोबतीला अभिनयाचे धडे घेत असताना त्याने स्वप्नांचा पाठलाग करत मुंबई गाठली.
अभिनय क्षेत्रात पाऊल कसं टाकावं याची माहिती मिळवण्यासाठी त्याने मुंबईतल्या एका जिममध्ये पर्सनल ट्रेनर म्हणून कामाला सुरुवात केली. या जिममध्ये बरेच कलाकार येत असल्याची माहिती मिळाल्यामुळे त्याने या जिमची निवड केली होती. मुंबईत कुणीच ओळखीचं नाही. लांबचे नातेवाईक कल्याणमध्ये रहात असत. कल्याण ते गोरेगाव असा रोजचा प्रवास करत विशाल पहाटे ६ ला जिम गाठायचा. जिमसोबतच जमेल त्याच्याकडून तो या क्षेत्राविषयीची माहिती मिळवत असे. अश्यातच त्याची ओळख मराठी इण्डस्ट्रीतल्या दोन कलाकारांशी झाली. ओळखीतून आणि स्वत:च्या मेहनतीने त्याने मॅगझिनसाठी फोटोशूट आणि ऑडिशन द्यायला सुरुवात केली. अनेक दिवसांच्या मेहनतीचं अखेर फळ मिळालं आणि विशालला एका सिनेमाची ऑफर मिळाली. सिनेमातले त्याचे कलागुण आणि सच्चेपणामुळेच स्टार प्रवाहवरील ‘साता जल्माच्या गाठी’ या मालिकेत युवराज या मुख्य भूमिकेसाठी त्याची निवड झाली.
अभिनय क्षेत्रात यायचं तर फिटनेसशिवाय पर्याय नाही याची त्याला जाणीव होती आणि आहे. त्यामुळेच तर शूटिंगच्या वेळा सांभाळत तो फिटनेसवरही तितकीच मेहनत घेतो. सिनेमातल्या एखाद्या गोष्टीप्रमाणेच विशालची कहाणी आहे. मालिकेमुळे तुम्हाला तत्काळ प्रसिद्धी मिळते. पण ‘साता जल्माच्या गाठी’ या मालिकेमुळे माझे आई बाबा खऱ्या अर्थाने सेलिब्रिटी झाल्याचं तो सांगतो. अभिनयासोबतच डान्स, मार्शल आर्ट्स आणि तलवार बाजीचंही विशालने प्रशिक्षण घेतलं आहे. क्रिकेटमध्येही तो पारंगत आहे. विशालच्या जिद्दीची ही कहाणी तमाम तरुणाईसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. विशालच्या या कलागुणांची झलक मालिकेच्या पुढील भागांमध्ये नक्कीच पाहायला मिळेल त्यालाठी पाहायला विसरु नका ‘साता जल्माच्या गाठी’ सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.