सूर नवा ध्यास नवा – स्वप्न सूरांचे स्वप्न साऱ्यांचे !

Sur Nava Dhyas Nava New Season
सूर नवा ध्यास नवा – स्वप्न सूरांचे स्वप्न साऱ्यांचे !

“सुरांना मिळणार हक्काचा मंच, स्वप्नांना नसणार वयाची अट”

जीवन उणे संगीत बरोबर शून्य… प्रत्येकाच्या आयुष्यात संगीताचे अनन्यसाधारण महत्व आहे. संगीत न आवडणारा माणूस शोधून देखील सापडणार नाही. आपले आयुष्य संगीताच्या सप्तसुरांनी व्यापले आहे. संगीतामुळे सगळ्यांच्या आयुष्यात नवचैतन्य येते… कलेला वयाची मर्यादा नसते असे म्हणतात, या सूत्राला घेऊन कलर्स मराठी पुन्हा एकदा घेऊन आला आहे प्रेक्षकांचा आवडता चैतन्यपूर्ण गाण्यांचा सांगीतिक कार्यक्रम ज्याच्या पहिल्या दोन्ही पर्वांनी प्रत्येक मराठी माणसाचे मन जिंकले “सूर नवा ध्यास नवा – स्वप्न सूरांचे, स्वप्न सार्‍यांचे”. कार्यक्रमाचा रंगमंच सूर आणि ताल यांनी पुन्हा बहरणार, संगीत मैफलीचा अनुभव रसिकांना विविध वयोगटातील सुरवीर देणार… स्वप्नांना वयाची अट नसणार कारण  या पर्वाचे वैशिष्ट्यच आहे ५ ते ५५ वयोगटातील सुरवीर या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन सुरवीर शोधून काढले आणि यामध्ये निवड झालेल्या स्पर्धकांमध्ये मेगा ऑडिशनची फेरी पार पडली. त्यामधून २२  सुरवीरांची निवड झाली आहे. आता महाराष्ट्रातील या २२ सुरवीरांचा सुरेल प्रवास सुरू झाला आहे. मागील पर्वाप्रमाणेच महाराष्ट्राची लाडकी स्पृहा जोशी सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर या सुरवीरांची पारख करण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्यासोबत असणार आहे आपल्या स्वरांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारे महेश काळे, अष्टपैलू अदाकार अवधूत गुप्ते… या पर्वाचा ध्यास देखील उत्तमातून उत्तम सुर शोधणे हाच असणार आहे. तेंव्हा सामील होऊया सुरांच्या या अनोख्या मैफिलीत सोम ते बुध रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

संगीत आणि मराठी माणसाचे अतूट नाते आहे. संगीताला रसिकांनी नेहेमीच आपल्या हृदयात जपलं आहे.  महाराष्ट्राने आजवर अनेक दर्जेदार गायक आपल्याला दिले आहेत. सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमाच्या तिसर्‍या पर्वाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांच्या मनामध्ये या पर्वाबद्दलची खूप उत्सुकता होती. ऑडिशन्सच्या दमदार भागांनंतर कार्यक्रमाबद्दलची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. मेगा ऑडिशनमधून निवड झालेल्या २२ स्पर्धकांमध्ये आता विजेतेपद मिळविण्याची चुरस बघण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांना मिळणार आहे. रसिक प्रेक्षकांना या पर्वामधून सुरेल संगीतिक नजराणा मिळणार आहे यात शंका नाही.

“सूर नवा ध्यास नवा” कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वाबद्दल बोलताना व्यवसाय प्रमुख, कलर्स मराठी वायाकॉम18 चे निखिल साने म्हणाले,सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाच्या दोन्ही पर्वांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. “छोटे सूरवीर” ने तर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. या दोन्ही पर्वानंतर नवीन काय ? अशी उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात होती आणि म्हणूनच वेगळा प्रयोग करण्याचं ठरवलं. पहिल्यांदाच पाच ते पंचावंन्न असा एक मोठा वयोगट एकत्र आणण्याची संकल्पना समोर आली. महाराष्ट्रभरातून या प्रयोगाला अतिशय भरघोस प्रतिसाद मिळाला. जवळजवळ पाच हजारहून अधिक लोकांनी यात सहभाग घेतला आणि आता त्यातील उत्तम असे अंतिम २२ स्पर्धक आम्ही घेतले आहेत. एक वेगळा प्रयोग रिऍलिटी शो मध्ये कलर्स मराठी करण्याचा प्रयत्न करत आहे”.

कार्यक्रमाविषयी बोलताना महेश काळे म्हणाले, “कार्यक्रमामध्ये ५ ते ५५ हा वयोगट असल्यामुळे आपल्याला बर्‍याच वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतील कारण यामध्ये उत्स्फुर्ततेची स्पर्धा आहे संयमासोबत आणि ऊर्जेची स्पर्धा आहे परिपक्वतेसोबत आणि म्हणूनच आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी अनुभवाला मिळणार आहेत. लोकांच्या गाण्यासोबत हळहळू त्यांचे आयुष्यदेखील उलघडत जाईल. यामुळेच हे पर्व धमाकेदार असणार आहे आस वाटत आहे”.

कलर्स मराठीच्या कुटुंबाचाच भाग असलेले अवधूत गुप्ते म्हणाले, “गेल्या इतक्या वर्षांपासून सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे आणि म्हणूनच याचवेळेस कलर्स मराठीने एक आगळीवेगळी थीम घेऊन पुढचे पाऊल उचलेले आहे. मला नाही वाटत अश्या प्रकारचा वयोगट, अशा प्रकारची थीम याआधी मराठीच नव्हे तर भारतातील कुठल्या वाहिनीवर झाली असेल… हे खूप छान आणि उत्साहवर्धक आहे कारण मला असे वाटत संगीताला वय नसते, त्यामुळेच आपण कधीतरी वयापलीकडे जाऊन बघायला हवं. या पर्वामध्ये खरतर आमचीच परीक्षा असणार आहे कारण जेंव्हा सात वर्षाची मुलगी आणि ४० वर्षाचा माणूस गाण सादर करेल तेंव्हा त्या दोघांना गुण द्यायचे आहेत. मी असे म्हणणे आतापर्यंत जर आम्ही व्यक्तींना गुण दिले असतील तर आता आम्ही गाण्याला गुण देणार आहोत. त्याक्षणी कोणत्या स्पर्धकाचे गाणे आनंद देऊन गेले या गोष्टीला गुण देणे म्हणजेच माणसाला त्याच्या वयाच्या पलीकडे जाऊन त्याच्या गाण्यावरून गुण देणे हे एक आव्हान आहे जे मी आणि महेश मिळून यावेळेस पार पडणार आहोत”.

सूर नवा, ध्यास नवा या कार्यक्रमाद्वारे वेगवेगळ्या वयोगटातील स्पर्धक आणि त्यांचे गायन अशी चुरस बघण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांना मिळणार आहे. तेंव्हा नक्की बघा “सूर नवा ध्यास नवा – स्वप्न सूरांचे, स्वप्न सार्‍यांचे” सोम ते बुध रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.