हिरकणी हे नाव जरी उच्चारलं तरी अनेकांच्या डोळ्यांसमोर धाडसी आईचं चित्र उभं राहतं जी आपल्या बाळासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता गडाची खोल कडा उतरुन खाली जाते. इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील धाडसी ‘हिरकणी’ची गोष्ट आता मोठ्या पडद्यावर अनुभवयाला मिळणार याची उत्सुकता अनेकांमध्ये असणार यात शंका नाही. प्रेक्षकांना एकीकडे ‘हिरकणी’ सिनेमाविषयी उत्सुकता असताना दुसरीकडे हे देखील जाणून घेण्यास आतुर होते की, नेमकी कोणती अभिनेत्री ‘हिरकणी’ साकारणार? आता या चर्चेला पूर्णविराम मिळालेला आहे कारण ‘हिरकणी’ सिनेमाचे मुख्य पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे.
प्रसाद ओक दिग्दर्शित आणि चिन्मय मांडलेकर लिखित ‘हिरकणी’चे नवीन पोस्टर नुकतेच पुण्यातील चतु:श्रृंगी मंदिर येथे प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरमधून प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पाठ्यपुस्तकातील हिरकणीला रुपेरी पडद्यावर साकारणार आहे आणि सोनालीच्या माध्यमातून हिरकणीला मिळालेला चेहरा लोकांच्या नक्कीच कायमस्वरुपी स्मरणात राहील याची खात्री आहे. विशेष म्हणजे अभिनेते सचिन खेडेकर यांनी मोशन पोस्टरला आवाज दिला आहे. या पोस्टर प्रदर्शनाच्या वेळी हिरकणी उर्फ सोनाली कुलकर्णी, अमित खेडेकर, प्रसाद ओक, राजेश मापुस्कर, लॉरेन्स डिसुझा उपस्थित होते. चतु:श्रृंगी मंदिरात प्रमुख भूमिकेचं पोस्टर लाँच करुन ‘हिरकणी’ टीमने देवीचे दर्शन घेतले.
प्रसाद ओक दिग्दर्शित ‘हिरकणी’ सिनेमाची निर्मिती इरादा एंटरटेनमेंटच्या फाल्गुनी पटेल आणि सहनिर्मिती लॉरेन्स डिसुझा यांनी केली आहे आणि राजेश मापुस्कर या सिनेमाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. कार्यकारी निर्माते म्हणून रत्नकांत जगताप यांनी काम पाहिले आहे. येत्या दिवाळीत २४ ऑक्टोबरला ‘हिरकणी’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.