स्टार प्रवाहवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेची प्रसिद्धी सातासमुद्रापार

स्टार प्रवाहवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेला दिवसेंदिवस प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षक जीवापाड प्रेम करत आहेत. बाबासाहेबांच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या सुभेदार रामजीबाबांचा त्याग आणि संघर्ष प्रत्येकाला आपलासा वाटतो तर मीरा आत्येच्या मायेत आपली आई दिसते. आनंदा, बाळारामाच्या भूमिकेत मोठ्या भावाचा आधार वाटतो तर तुळसा, मंजूळाच्या रुपाने मोठ्या बहिणींची सावली अनुभवायला मिळते आहे. भीवा, रामजी बाबा, मीरा आत्या, तुळसा, आनंदा ही प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झाल्या आहेत. सोशल मीडिया हे आताच्या घडीला प्रभावी माध्यम असल्यामुळे त्याद्वारे मालिकेविषयी वाटणारा आदर आणि प्रेम प्रेक्षक व्यक्त करत आहेत. या मालिकेतील सर्व कलाकारांच्या आणि स्टार प्रवाहच्या फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर नजर टाकली तर प्रेक्षकांच्या प्रेमाचा वर्षाव नक्कीच पाहायला मिळेल. फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातूनच नाही तर पत्र लिहून प्रेक्षक आपल्या प्रतिक्रिया कळवत आहेत. परंतु छोटय़ा पडद्यावरील मालिकांमध्ये क्वचितच चरित्रपट साकारलेले दिसतात. चित्रपट असो मालिका वा नाटक कोणत्याही माध्यमात चरित्रपट साकारणे हे आव्हानच असते. ही आव्हाने लक्षात घेऊन स्टार प्रवाह या वाहिनीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची गौरवगाथा प्रेक्षकांसमोर आणली. प्रेक्षकांच्या प्रेमामुळे या मालिकेने नुकताच ५० भागांचा यशस्वी टप्पाही पूर्ण केला.

नावीन्यपूर्ण आणि तरुणाईला भावतील असे विषय घेऊन सतीश राजवाडे कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. परंतु ही मालिका उभी करण्यात स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख म्हणून त्यांचा मोठा वाटा आहे. मालिकेविषयी सतीश राजवाडे सांगतात, हा विषय करायचाच होता. कारण केवळ त्या व्यथा, जाणीवा आणि संघर्ष लोकांपर्यंत पोहोचवायचा नव्हता तर त्या संघर्षांतून महामानव कसा घडतो हे जगासमोर आणायचे होते. या संकल्पनेला तीन तासांचा चित्रपट न्याय देऊ  शकत नाही हे लक्षात आल्यामुळे मालिका हे प्रभावी माध्यम निवडले, असे सतीशने सांगितले. हल्ली मुलांचे वाचन कमी झाले आहे, परंतु दृकश्राव्य माध्यमातून बाबासाहेब त्यांच्यासमोर आले तर ते त्यांना जास्त आवडेल. मालिकेच्या माध्यमातून घराघरांत बाबासाहेब पोहोचावेत, असा उद्देश होता. त्यांच्या आयुष्यातील राजकीय घडामोडी जगाला माहिती असतील, पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी बालपणी जो संघर्ष करावा लागला, जे हाल सोसावे लागले ते मात्र पडद्याआड आहेत. आणि तेच दाखवण्यासाठी मालिकेचे कथानक बालपणापासून सुरू होते, असे त्यांनी स्पष्ट केले. सत्य कथा सांगणे हा एकमेव स्वच्छ उद्देश यामागे आहे. प्रत्येक प्रसंगाला बाबासाहेब तोंड देत राहिले, परंतु ते मागे फिरले अशी एकही घटना त्यांच्या आयुष्यात सापडणार नाही. आणि ही जिद्द, चिकाटी त्या काळात बाळगणाऱ्या या सामान्य माणसाच्या जाणिवा निश्चितच असामान्य होत्या. म्हणून ही कथा नसून शिकण्याची प्रक्रिया आहे. कौटुंबिक नाटय़ाच्या पलीकडे जाऊन काहीतरी वेगळा आणि ज्ञान देणारा विषय लोकांपुढे मांडता आला याचा आनंद अधिक असल्याचेही सतीश राजवाडे यांनी सांगितले.

आज कोट्यावधी लोक ही मालिका बघतात. कार्टून आणि मोबाईलमध्ये रमणाऱ्या लहानग्या मंडळीनाही या मालिकेची गोडी लागली आहे. मालिकेत भीवाच्या तोंडी नेपोलियनच्या पुस्तकाचा उल्लेख येताच मुलांनी लायब्ररीमधून, दुकानांमधून नेपोलियनचं चरित्र शोधून काढलं आणि ते वाचलं. या सीनमुळे नेपोलियनच्या पुस्तकांचा खप मोठ्या प्रमाणात वाढला. हा बदल स्वागतार्ह आहे. या मालिकेमुळे वाचन, चर्चा, चिंतन आणि प्रबोधन होतंय असं म्हण्टलं तर वावगं ठरणार नाही. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेमुळे जनमानसात होणारे अमूलाग्र बदल, काहीतरी शिकायला मिळत असल्याची भावना सुखावणारी आहे. टेलिव्हिजन माध्यमातला हा सकारात्मक बदल आहे आणि प्रेक्षक तो मनापासून स्वीकारत आहेत. फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात या मालिकेची प्रसिद्धी पोहोचली आहे. युरोप आणि अमेरिकेसारख्या विदेशांमध्येही ही मालिका पाहिली जात असल्याचे अभिप्राय येत आहेत. उत्तर आणि दक्षिण भारतामधूनही महामानवाची गौरवगाथा दाखवली जावी अशी विनंतीपत्र मराठी भाषिकांकडून येत आहेत.

‘पिढी बदलते त्याप्रमाणे माध्यमं बदलतात. आता पर्यंत ग्रंथ, श्राव्य, सिनेमा आणि त्यानंतर दूरचित्रवाणी माध्यम प्रेक्षकांमध्ये स्थिरावलं. या मालिकेमुळे महामानवाचे विचार जनमानसात पोहोचत आहेत.’

‘मालिका पहाताना जेवणाचाही विसर पडतो’, ‘बाबासाहेबांचे या देशावर आणि प्रत्येक भारतीयावर खूप उपकार आहेत. त्यातून उतराई होणं शक्य नाही. या मालिकेतून आंबेडकर पुन्हा एकदा अनेकांच्या काळजाला भिडत आहेत.’ या आणि अश्या कित्येक प्रतिक्रिया मालिकेच्या संपूर्ण टीमचा उत्साह वाढवत आहेत. लवकरच मालिकेत भीवाचा मॅट्रिक होण्याचा प्रसंग पाहायला मिळणार आहे. अस्पृश्य समाजात मॅट्रिक होणारे बाबासाहेब हे पहिले व्यक्ती होते. बाबासाहेबांच्या आयुष्यातला हा ऐतिहासिक प्रसंग मालिकेतून पहायलं मिळणं म्हणजे एक अनोखी पर्वणी असेल. ‘एक वेळ भाकरीचं ताट मोडून दोन्ही तळहाताचे ताट करुन भाकर खाऊ पण ज्ञानाची भूक आधी भागवू’ असे विचार असणारं हे आंबेडकरांचं कुटुंब. बाबासाहेबांच्या आयुष्यातले असे अनेक प्रसंग मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी पाहायला विसरु नका ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ महामानवाची गौरवगाथा सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

 

Dr. Babasaheb Ambedkar Serial Becomes Popular OverseasDr. Babasaheb Ambedkar Serial Becomes Popular OverseasDr. Babasaheb Ambedkar Serial Becomes Popular OverseasDr. Babasaheb Ambedkar Serial Becomes Popular OverseasDr. Babasaheb Ambedkar Serial Becomes Popular OverseasDr. Babasaheb Ambedkar Serial Becomes Popular OverseasDr. Babasaheb Ambedkar Serial Becomes Popular OverseasDr. Babasaheb Ambedkar Serial Becomes Popular OverseasDr. Babasaheb Ambedkar Serial Becomes Popular OverseasDr. Babasaheb Ambedkar Serial Becomes Popular OverseasDr. Babasaheb Ambedkar Serial Becomes Popular OverseasDr. Babasaheb Ambedkar Serial Becomes Popular OverseasDr. Babasaheb Ambedkar Serial Becomes Popular OverseasDr. Babasaheb Ambedkar Serial Becomes Popular Overseas