“विवाह संस्थेवर ग्रामीण पद्धतीने मार्मिक टिपण्णी”
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा क्षण असतो. अनेकांसाठी आनंदाचा तर काहींसाठी मात्र त्रासदायक ठरतो. वाढते शहरीकरण, शेतीची दुरावस्था, बेरोजगारी यांतून अनेक सामाजिक प्रश्न उभे राहिले आहेत. ग्रामीण भागात ही याचे परिणाम दिसू लागले आहेत. या साऱ्या प्रश्नांचा वेध विनोदी आणि मार्मिक पद्धतीने घेणारा ‘बायको देता का बायको’ हा मराठी चित्रपट २३ ऑगस्टला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा शानदार संगीत व ट्रेलर अनावरण सोहळा युवा संगीतकार जोडी चिनार- महेश यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. वाय डी फिल्मस्’ निर्मित ‘बायको देता का बायको’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेश साहेबराव ठाणगे यांचे तर निर्मिती धनंजय रामदास यमपुरे यांची आहे.
शेतीत उत्पन्न नाही, नोकरीची संधी नाही, वाढती महागाई आणि त्यात जोडीदारांबद्दलच्या अवास्तव अपेक्षा यांतून आजची तरुण पिढी त्रस्त आहे. ही स्थिती अनेक घरांतून दिसत असली तरी या सामाजिक प्रश्नाकडे फारसे गांभीर्याने पाहिल्याचे दिसत नाही. या चित्रपटाच्या माध्यमातून या साऱ्याचा ऊहापोह अतिशय गमतीशीरपणे करण्यात आला आहे.
ए.आर माने, धनश्री गणात्रा अरुण पवार यांनी लिहिलेल्या गीतांना गायक सुरेश वाडकर, हंमसिका अय्यर, आर्या आंबेकर, रोहित राऊत यांचा स्वरसाज लाभला आहे. धनश्री गणात्रा. ए आर माने यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. पार्श्वसंगीत अवि लोहार यांनी दिले आहे.
सुनील गोडबोले, किशोर ढमाले, अभिलाषा पाटील, वैशाली जाधव, सिद्धेश्वर झाडबुके, प्रशांत जाधव, राणी ठोसर, श्वेता कुलकर्णी, आरती तांबे, अमोल पठाडे, वैष्णवी अनपट, प्रतीक पडवळ, हनुमंत गणगे प्रीतम साळुंखे, प्रमिला जगताप, महादेव सवई या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत. कथा–पटकथा–संवाद सुरेश साहेबराव ठाणगे यांची आहे. छायांकन विश्वजीत साहू तर नृत्यदिग्दर्शन राजेश राणे, नंदुकुमार, अमिता कदम यांचे आहे. संकलन राजेश शाह यांचे आहे. साऊंड मिक्सिंग राजीव कुमार तर ध्वनीमुद्रण जबाबदारी संकीर्तन सिदर, सय्यद सिकंदर, विशाल बनसोडे यांनी सांभाळली आहे. कला दिलीप धुमाळ यांची आहे रंगभूषा रवी फुटाणे तर वेशभूषा सुनील भाडळे यांची आहे. निर्मिती व्यवस्था सतीश टापरे यांची असून कार्यकारी निर्माते सागर सूर्यवंशी, कुपेन्द्र पवार आहेत.
विवाह संस्थेवर ग्रामीण पद्धतीने गमतीशीर टिपण्णी करणारा ‘बायको देता का बायको’ २३ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.