Home TV Serials नवरात्रोत्सव विशेष : तुळजाईच्या बालसेनेची शौर्यगाथा आणि देवीच्या दिव्य रूपाचा भव्य आविष्कार!

नवरात्रोत्सव विशेष : तुळजाईच्या बालसेनेची शौर्यगाथा आणि देवीच्या दिव्य रूपाचा भव्य आविष्कार!

Aai Tuljabhavani Bal Rup

पहा आई तुळजाभवानी ८.५० वा. आपल्या कलर्स मराठीवर. 

कलर्स मराठीवरील आई तुळजाभवानी मालिकेत बालशौर्याच्या नव्या प्रवासाची साक्ष देणारी ‘तुळजाची बालसेना’ प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. विशेष म्हणजे मालिकेच्या नवरात्रोत्सव विशेष भागात या बालसेनेच्या माध्यमातून आई तुळजाईने भक्तांना दिलेली प्रेरणा एक अत्यंत महत्वाचे जीवनमूल्य शिकवते.

असुरिकेशी झालेल्या संघर्षात पद्मावर झालेला हल्ला आणि त्यामुळे पुरती घाबरलेली बाळटोळी “असुरांशी लढणं आपलं काम न्हाई” असे म्हणत हतबल झाली आहे. या मुलांना धीर देण्यासाठी बालरुपातली तुळजाई सज्ज झाली आहे. एका आगळ्यावेगळ्या दैवी लीलेतून ती बाल सेनेला एक नवी शिकवण देणार आहे, जी प्रत्येकालाच उपयोगी ठरणारी आहे.

सध्या या मालिकेचे कथानक अत्यंत रंजक वळणावर असून, शुक्राचार्यांच्या मदतीने महिषासुर पोथीतून मुक्त झाल्यानंतर महादेवांच्या लीलेने गुफेत बंदिस्त असलेली ‘असुरिका’ ब्रम्हदेवांच्या वरदानाने प्रकट झाली आहे. या दोन दुष्ट शक्तींचा सामना करताना बालरूपातील तुळजाई आणि तिच्या बालसेनेसमोर नवे आव्हान उभे ठाकले आहे. हे नुसतेच नवे मायावी संकट नाही तर असूरिकाने रचलेली मोठी मायावी लीला आहे. जी डोळे दिपवून टाकणारी आहे, ज्यात निर्माण होणारा मायावी महाल, त्यात असलेले कपटी मायाजाळ आणि त्याला शह देताना निर्माण होणारी त्याहूनही भव्य दैवी लीला डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे. अत्याधुनिक व्हीएफएक्स तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पौराणिक काळ जिवंत करणारा हा कथाभाग प्रेक्षकांना निश्चितच खिळवून ठेवेल.

Aai Tuljabhavani Bal Rup

या अद्भुत दैवी लीलेसोबतच तुळजाई स्वसंरक्षणाचे मूल्य रुजवत झुंज देण्याचे बळ देते आहे. एकीची शपथ घेऊन अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सज्ज झालेल्या ‘बालसेनेने’ तुळजाच्या मार्गदर्शनाखाली, आगामी अश्विन शुद्ध दशमीला असुरिकेला तिच्या पापांची शिक्षा देण्याचा विडा उचलला आहे. एकीचे धडे, खेळाच्या माध्यमातून होणारे प्रशिक्षण आणि बालशौर्याची ही रोमहर्षक गाथा प्रेक्षकांसाठी एक पर्वणी ठरणार यात शंका नाही.

तसेच यंदाच्या नवरात्रोत्सवात आई तुळजाभवानीचे दिव्य, तेजस्वी आणि भव्य रूप मालिकेत अनुभवायला मिळणार आहे. भक्ती, स्त्रीशक्ती आणि न्यायाचे प्रतीक असलेल्या तुळजाईच्या या विशेष रूपातून देवीच्या अलौकिक सामर्थ्याचे आणि मायेचे दर्शन घडणार आहे. “भक्तीचा तू सोहळा… तू स्त्रीशक्तीची ढाल, मायेची सावली… तू न्यायाची मशाल, सदैव पाठीशी असू दे कृपा तुझी विशाल!” या भक्तिमय ओळींच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानीचे तेजस्वी आभूषणांनी सजलेले रूप,त्यात हातातील शंख, कमळ, गदा, त्रिशूळ, तलवार आणि सुदर्शन चक्र यांची भव्यता पाहायला मिळणार आहे. प्रत्यक्ष चित्रीकरणाला एआय तंत्रज्ञानाची जोड देऊन साकारलेले दिव्य प्रकाशकिरणांनी उजळलेले आणि प्रसन्न मुद्रेने खुललेले देवीचे अलौकिक रूप यंदाच्या नवरात्रोत्सवात प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

 

[ Keywords : Aai Tuljabhavani Bal Rup, Aai Tuljabhavani, Aai TuljaBhawani, Devi, Navratri, Colors Marathi, Marathi Serial ]