सहकुटुंब सहपरिवार, आई कुठे काय करते, रंग माझा वेगळा आणि फुलाला सुगंध मातीचा मालिकेत पाहायला मिळणार नात्यांचे बदलते रंग
मराठी परंपरा मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीवर होळी आणि धुळवडीच्या सणाचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेत होळीच्या सणाची धामधूम पाहायला मिळणार आहे. या जल्लोषात ढवळे मामी भांगेच्या नशेत अक्काच्या कारस्थानांचा पश्याकडे खुलासा करणार आहे. त्यामुळे होळीच्या जल्लोषासोबतच मालिकेत अक्काचा डाव उलटला जाणार आहे. अक्काच्या कारस्थानांपासून पश्या कुटुंबाचं रक्षण कसा करणार याची उत्सुकता असेल.
‘आई कुठे काय करते’ यावर्षीही होळीचा सण उत्साहात साजरा होणार आहे. यंदाच्या उत्सवावर कोरोनाचं सावट असल्यामुळे पुजाविधी कुटुंबाच्या उपस्थितीतच पार पडणार आहे. सध्या अनिरुद्ध-संजना प्रकरणामुळे घरात चिंतेचं वातावरण असलं तरी होळीचा सण मात्र एकत्रित येऊन साजरा करण्याचं सर्वांनी ठरवलं आहे. देशमुख कुटुंबात आनंदाचं वातावरण असताना संजनाची एण्ट्री झाली नाही तरच नवल. होळीच्या या पारंपरिक पुजेत संजनाला देखिल सहभागी करावं अशी अनिरुद्धची इच्छा असते. अनिरुद्धच्या अश्या वागण्याने अरुंधती दुखावली जाते. देशमुखांच्या होळीच्या या पुजाविधीमध्ये संजना सहभागी होणार का हे मालिकेच्या २८ मार्चच्या महाएपिसोडमध्ये पाहायला मिळाले.
‘रंग माझा वेगळा’ मालिकेत दीपा आणि कार्तिकच्या नात्यावर गैरसमजांचं मळभ आहे. होळीच्या निमित्ताने या दोघांमधले गैरसमज दूर होतील असं वाटत असतानाच दोघांमधील दुरावा आणखी वाढला आहे. दीपा कार्तिकच्या नात्याचं भविष्य काय असेल हे मालिकेच्या पुढील भागांमध्ये उलगडेलच पण या संपूर्ण टीमने जल्लोषात होळी साजरी केली आहे.
फुलाला सुगंध मातीचा मालिकेतही शुभम-कीर्तीच्या नात्यात दुरावा आला आहे. ऐन सणाच्या दिवशीही शुभम कीर्तीकडून रंग लावून घेत नाही. शुभमचं हे वागणं कीर्तीला खटकतं. शुभमच्या अश्या वागण्याचं कारण कीर्तीला कळेल का? दोघांमधील हा दुरावा आणखी किती काळ रहाणार हे मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळेल. होळीच्या निमित्ताने शुभम-कीर्तीवर एक रोमॅण्टिक गाणं देखिल चित्रित करण्यात आलं आहे.