डॉक्टर व्हायचं! अशी अनेकांची इच्छा असते. कधी ती पूर्ण होते तर कधी ती अपूर्णच राहते. अशा वेळी अनेकजण आपली ही अपूर्ण इच्छा आपल्या मुलांकडून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात, मग त्या मुलांची इच्छा असो वा नसो!! असंच काहीसं घडलं केशव आणि पुष्कर या जानी दोस्तांच्या बाबतीत. त्यांच्या पालकांच्या आग्रहाखातर ते मेडिकलला ऍडमिशन घेतात तर खरं पण तिथे त्यांचे वेगळेच उदयॊग सुरु होतात. त्यांच्या उपद्व्यापाने सगळेच बेजार होतात. डॉक्टर होण्यासाठी आलेले हे दोघे काय धमाल उडवतात ? हे पहायला मिळणार आहे ‘डॉक्टर डॉक्टर’ या आगामी मराठी चित्रपटात.
मात्र त्यासाठी आपल्याला कुठेही जायची गरज नाही. आपल्या घरातच मनोरंजनाची बहार उडवून देण्यासाठी ‘झी प्लेक्स’ सज्ज झालं आहे. येत्या ३० ऑक्टोबर ला ‘डॉक्टर डॉक्टर’ हा चित्रपट आपल्याला ‘झी प्लेक्स’वर पहायला मिळणार आहे आणि तेही फक्त ९९ रुपयात. ‘झी प्लेक्स’द्वारे मनोरंजनाचं हे वेगळं दालन प्रेक्षकांसाठी खुलं झालं असून ‘झी प्लेक्स’वर प्रदर्शित होणारा ‘डॉक्टर डॉक्टर’ हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.
या चित्रपटाची निर्मिती किरण कुमावत, गौरी सागर पाठक, सूरज दगडे-पाटील यांनी केली आहे. अमोल कागणे यांची सहनिर्मिती आहे. चित्रपटाचे लेखन सागर पाठक व प्रीतम एस. के. पाटील यांचे आहे. प्रितम पाटील दिग्दर्शित या चित्रपटातून प्रथमेश परब, आणि पार्थ भालेराव यांची धमाल प्रत्येकाला खळखळून हसायला लावणार आहे. या दोघांसोबतच रमेश परदेशी, सिद्धेश्वर झाडबुके, विनोद खेडकर, अमोल कागणे आदि कलाकार झळकणार आहेत.