सुरभी आणि सिध्दार्थ यांचे ‘क्षण हे का लांबले’ गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला
‘क्षण’ हा शब्द जरी छोटा असला तरी त्यात खूप काही सामावलेलं असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक क्षणाची एक वेगळी आठवण असते. काही क्षण हे आनंदाचे असतात, काही हळवे असतात तर काही दुराव्याचे, विरहाचे असतात आणि हे क्षण आठवताना डोळ्यांसमोर उभ्या राहतात त्या मनाशी दडलेल्या काही सुखद आठवणी. या काही ओळींतून नेमकं काय म्हणायचंय हे तुम्हांला एका नवीन गाण्यातून कळणार आहे ज्याचे नाव आहे ‘क्षण हे का लांबले’.
सप्तसूर म्युझिक प्रस्तुत आणि साईनाथ राजाध्यक्ष निर्मित ‘क्षण हे का लांबले’ हे इमोशनल गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. या गाण्याच्या निमित्ताने एक नवीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अभिनेत्री सुरभी हांडे आणि अभिनेता सिध्दार्थ बडवे यांची प्रमुख भूमिका असलेलं हे गाणं अनेकांच्या भावनांना बोलकं करेल. या गाण्याच्या निमित्ताने सुरभी हांडे बऱ्याच महिन्यांनी प्रेक्षकांना एका नव्या भूमिकेत दिसणार आहे.
या सुंदर गाण्याला माधुरी करमरकर यांनी आवाज दिला आहे तर सविता करंजकर जमाले यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. महेश खानोलकर यांनी या गाण्याचे संगीत दिग्दर्शन केले आहे तर अमित पाध्ये यांनी देखील संगीतात म्युझिक अरेंजर म्हणून साथ दिली आहे. गाण्याची सिनेमॅटोग्राफी पराग सावंत यांनी केली आहे आणि फिल्मी आऊल स्टुडियोझच्या टीमने प्रॉडक्शनच्या कामाची जबाबदारी पेलली आहे.
आतापर्यंत सप्तसूर म्युझिकची ‘वसईच्या नाक्यावर’ आणि ‘लाजिरा’ ही दोन गाणी प्रदर्शित झाली आहेत, आता त्यांचे ‘क्षण हे का लांबले’ हे तिसरं गाणं पण तुमच्या मनात हक्काची जागा तयार करेल असा विश्वास वाटतो.