अक्कलकोट भूमी ही स्वामी समर्थांच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी. अक्कलकोट समाधी मठात लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. श्री दत्तगुरुंचा अवतार असणाऱ्या स्वामी समर्थांच्या दर्शनाची आस प्रत्येकाच्याच मनात असते. हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या या समाधी मठात नुकताच बालदत्तांची भूमिका साकारणाऱ्या यश राणेचा सत्कार करण्यात आला. चिमुकल्या यशसाठी हा सन्मान भारावून टाकणारा होता. साक्षात स्वामी मठात कौतुक होत असल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता.
यश ‘स्टार प्रवाह’वरील ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकेत बालपणीच्या दत्तांची भूमिका साकारत आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. सेटवरही अनेक चाहते भेट देऊन श्री दत्तांची भेट घेत असतात. या मालिकेच्या निमित्ताने श्री दत्तुगुरुंच्या अवताराची गोष्ट पाहायला मिळत असल्याच्या प्रतिक्रियाही देतात. लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच गुरु-शिष्य परंपरा अनुभवण्याची संधी मिळत आहे. ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकेची लोकप्रियता देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. याच प्रेमापोटी अक्कलकोट इथल्या समाधी मठात बालदत्तांची भूमिका साकारणाऱ्या यशला आवर्जून बोलावून त्याचा सत्कार करण्यात आला.
बालदत्तांच्या अवताराला भरभरुन प्रेम मिळतच आहे. लवकरच ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकेत दत्तगुरुंचा २४ गुरु प्राप्त करण्याचा प्रवास पाहायला मिळणार आहे. ज्या शक्तीला, निसर्गाला मनुष्यप्राणी रोज पहातो त्यातून बोध घेण्यास विसरतो. आयुष्याला दिशा देणारे हेच खरे गुरु असतात. हे २४ गुरु नेमके कोण? त्यांनी दत्तगुरुंना नेमकी कोणती शिकवण दिली? आणि त्या शिकवणीचा फायदा आत्ताच्या पिढीला कसा होईल? हे मालिकेतून पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांसाठी हा नक्कीच समृद्ध करणारा अनुभव असेल. त्यासाठी न चुकता पाहा श्री गुरुदेव दत्तांचा २४ गुरु प्राप्त करण्याचा प्रवास सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.