दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर घेऊन येत आहोत आपल्या घराचा आरसा – ‘सुखी माणसाचा सदरा’

Sukhi Manasacha Sadara

कलर्स मराठीवर २५ ऑक्टोबर रात्री ९.३० वा. विशेष भाग
आणि २६ ऑक्टोबरपासून सोम ते शनि रात्री ९.३० वा.

सुख नक्की कशात असतं ? खरंतर आपण ज्यामध्ये मानू त्यामध्ये ते असतं. तसं बघायला गेलं तर सुखाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी… कोणासाठी पावसाची पहिली सर, तर कोणासाठी पावसाळ्यात मिळणारी सुट्टी…कोणासाठी सोनचाफ्याचा सुवास तर कोणासाठी तेच फूल बायकोच्या केसात माळणं.. कोणी कुटुंबामध्ये आनंद शोधतं तर कोणी कुटुंबाला आनंदी ठेवण्यासाठी झटत असतं…म्हणूनच कदाचित म्हणत असतील या सगळ्यापेक्षा आनंदी वृत्तीचा, सुख, समाधानाचा चष्मा डोळ्यांवर घालणं महत्वाचं… एकदा का तो घातला की सगळं जग सुंदर दिसू लागतं आणि आपलं संपूर्ण आयुष्यच मुळी न संपणारा आनंदमय उत्सव बनून जातं… ‘लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा’ लहानपण विचारात नाही तर आचरणात असावं लागतं. आपली कुवत ओळखून ती स्वीकारता आली की मग जगण्यातील सहजता वाढते आणि आयुष्याचा प्रवास सुखकर होतो… साखरेच्या एका दाण्यावर मुंगी खुश असते, म्हणजेच अल्पसंतुष्टी हे जीवनातील आनंदाचं गमक आहे हे ती सांगून जाते… आपण नेहमीच ऐकतो सुखी माणसाचा सदरा हा प्रत्येकालाच हवा असतो पण तो दुर्मिळ नाही, प्रत्येक माणूस तो त्याच्याकडे असलेल्या धाग्यांमधून विणू शकतो.. आणि हेच गमक आचारणात आणून आपलं आयुष्य जगणारे चिमणराव आणि त्यांचं सुखी कुटुंब येत आहे दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर आपल्या सगळ्यांच्या भेटीला. केदार शिंदे (स्वामी क्रिएशन्स) निर्मित आणि दिग्दर्शित ‘सुखी माणसाचा सदरा’ २५ ऑक्टोबर रात्री ९.३० वा. आणि २६ ऑक्टोबरपासून सोम ते शनि रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर. केदार शिंदे या मालिकेद्वारे छोट्या पड्यावर पुनरागमन करणार असून महाराष्ट्राचा लाडका अभिनेता म्हणजेच भरत जाधव मालिकेत चिमणच्या भूमिकेत दिसणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, श्रुजा प्रभुदेसाई, विजय पटवर्धन हे कलाकार मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत आहेत.

नात्यांचे बंध, एकत्र कुटुंब, आपल्या माणसांवरील प्रेम, हे सध्या कुठेतरी  हरवत चाललं आहे… प्रत्येक माणूस सुखाच्या शोधात आहे. जे त्याच्याकडे नाहीये वा जे दुसर्‍याकडे आहे ते मिळवण्याच्या मागे धावतो आहे… पण याविरुध्द चिमणराव आणि त्यांची बायको कावेरी आणि त्यांचा संपूर्ण परिवार आहे जे त्यांच्या कुटुंबासोबत, एकमेकांच्या आनंदात आणि त्यांच्याकडे जे आहे त्यामध्ये सुखी आहेत… चिमण आणि त्याच्या कुटुंबाकडे रूढार्थाने सगळी सुखं  नाहीये पण त्यांनी तो आनंद, सुख एकमेकांमध्ये  शोधलं आहे… आणि म्हणूनच कुठल्याही संकंटावर ते हसतहसत मात करतात, वेळेला एकमेकांना आधाराचा हात देतात, वेळ पडली तर कानउघडणी करतात. संस्कार आणि नीतीमूल्य त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाची आहेत. त्यामुळेच जे या कुटुंबाकडे बघतात त्यांना ती गोष्ट हवी आहे जी चिमणरावांकडे आहे आणि ती म्हणजे’ सुखी माणसाचा सदरा’.

मालिकेबद्दल बोलताना प्रमुख – मराठी टेलिव्हीजन, वायाकॉम18 चे दीपक राजाध्यक्ष म्हणाले,असं म्हणतात सुख पाहता जवापडे दु:ख पर्वता एवढे… दुसरा किती सुखी आणि मी किती दु:खी असे आपल्याला सतत वाटत असतं… आपण आपल्या सुखाची तुलना दुसर्‍याच्या सुखाबरोबर करत असतो. पण प्रत्येकाचं दु:ख ज्याचं त्याला माहिती असतं. वास्तविक सुख हे अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आहे, पण ते आपल्या मानण्यावर आहे हे मात्र तितकंच खरं… आजच्या धकाधकीच्या जीवनात, घड्याळाशी स्पर्धा करणाच्या नादात आणि खूप काही मिळवण्याच्या हव्यासात आपण विसरतोय ते ‘सुख’ ! सुखाचा शोध घेण्यात आयुष्य खर्ची होतं आहे… खरं तर ते दडलयं आपल्या आत, आपल्या माणसात, त्यांच्या आनंदात. ‘सुखी माणसाचा सदरा’ या मालिकेद्वारे आम्ही प्रेक्षकांपर्यंत हेच पोहचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुखाचा नव्याने पण हसत हसत शोध घेणारी तर कधी गांभीर्याने हितगुज करणारी मालिका आम्ही विजयादशमीच्या शुभमुहुर्तावर आपल्या भेटीला आणत आहोत. दिग्दर्शक, लेखक केदार शिंदे आणि भरत जाधव एकत्र येणार म्हणजे मनोरंजनाची शंभर टक्के हमी. तुमच्या आमच्या रोजच्या जीवनातील, तुमची आमची गोष्ट म्हणजे ही मालिका आहे”.

कार्यक्रमाविषयी बोलताना मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, ‘सुखी माणसाचा सदरा नेहमीच सगळ्यांना हवाहवासा वाटतो… आपल्याला नेहेमीच असं वाटतं समोरचा माणूस खूप सुखी आहे पण सुख आपल्यातच दडलेलं असतं. मी खूप वर्षांपूर्वी एक मालिका केली होती त्या मालिकेतील कुटुंब प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस पडलं होतं. बऱ्याच काळानंतर जेव्हा मालिका करायचं ठरवलं तेंव्हा मी एकत्र कुटुंब पध्दती, त्यांच्या छोट्या छोट्या सुखाच्या गोष्टी, दु:ख पचवण्याच्या क्रिया किंवा त्यांचे आनंद ज्याची कुठेतरी टेलिव्हीजनवर कमतरता भासते आहे ते दाखविण्याचा निर्णय घेतला. सर्वसामान्य माणसाला टेलिव्हीजन हे एक त्यांच्या घरातलं प्रतिनिधी वाटू लागलं आहे हे मात्र खरं… आपल्याच घरातला प्रतिंनिधी अत्यंत चुकीच्या पध्दीतीने जर वागत असेल तर बाकीच्या मंडळींवर देखील तेवढाच परिणाम होईल यावर मी बराच काळ विचार करत होतो… कलर्स मराठीद्वारे लॉकडाउन मध्ये मी जी एक गोष्ट लिहिली तिला दाखविण्याची संधी मिळाली. ती गोष्ट म्हणजे ‘सुखी माणसाचा सदरा’…म्हणजे रसिक प्रेक्षकांच्या घरातला आरसा आहे आणि त्यांचं प्रतिबिंब त्यांना या मालिकेत बघता येईल अशी मालिका निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत ”.

‘मी आणि भरत जाधव जेव्हा जेव्हा एकत्र आलो आहोत तेव्हा लोकांना अत्यंत आनंद झाला आहे आणि तो आनंद देण्याचं कर्तव्य आणि जबाबदारी आमचीच आहे. भरत जाधव एक उत्तम अष्टपैलू अभिनेता आहे. चिमणसाठी भरतशिवाय इतर कुणाचा विचारही डोकावला नाही..इतका भरत चिमणमय झाल्याचा अनुभव आपणा सगळ्यांना येईल अशी माझी खात्री आहे.”

आपल्या भूमिकेविषयी बोलताना ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी म्हणाल्या, ‘ मी केदारसोबत एका चित्रपटासाठी काम केलं आहे, त्याच्याबरोबरचा काम करण्याचा अनुभव फारच छान होता… तसाच यावेळेस देखील असेल अशी माझी आशा आहे. भरतसोबत मी पहिल्यांदाच काम करते आहे, भरतसोबत काम करण्याचा योग आता या मालिकेमुळे आला. भरत खूप छान अभिनेता आहे. ‘सुखी माणसाचा सदरा’ अत्यंत सरळ, साधी सोपी अशी मालिका आहे, या साधेसोपे सरळपणामुळे निर्माण होणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचा अनुभव आम्ही सगळे घेतो आहोत. मी या मालिकेमध्ये आजीची भूमिका साकारणार आहे. ही आजी जरा गंमतीशीर आहे… माझ्या इतर भूमिकांप्रमाणेच ही आजी देखील प्रेक्षकांना आवडेल याची मला खात्री आहे”.

कार्यक्रमाविषयी बोलताना भरत जाधव म्हणाले, ‘वेगळ्या धाटणीची मालिका, उत्तम विषय आणि केदार शिंदे यामुळे मी मालिका करण्याचा निर्णय घेतला… सध्या एकत्र कुटुंब, रूढी – परंपरा, आपली संस्कृती, विशेषत: संस्कार याचा विसर पडत चालला आहे. नकळत पुढच्या पिढीकडून हे सगळं दुर्लक्षित होतं आहे. पण, आमच्या मालिकेतील चिमणरावांच कुटुंब असं आहे जे हे सगळं सांभाळून आहेत… संपूर्ण कुटुंब एकत्र राहून संकटाला सामोरी जातात हा एकमेव छान धागा या मालिकेचा आहे… याचसोबत उत्तम कलाकारांची फळी आहे आणि आमच्यासोबत आहेत रोहिणी हट्टंगडी… रोहिणीताईंसोबत काम करण्याचा कधीच योग या मालिकेद्वारे आला त्यामुळे मी खूप खुश आहे… सध्याच्या या लॉकडाउनच्या काळात आपल्या सगळ्यांच्याच समस्या खूप वाढत चालल्या आहेत, खूप तडजोडी कराव्या लागत आहेत पण नात्यांमध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड करणे योग्य नाही… नातं सांभाळून आपण कसं सुखी मार्गाने पुढे जाऊ हे सांगणारी मालिका म्हणजे ‘सुखी माणसाचा सदरा’. आम्हांला खात्री आहे की तुम्हांला आमची मालिका नक्कीच आवडेल”.

‘सुखी माणसाचा सदरा’ हा प्रत्येकाच्याच कपाटात असतो, फक्त तो काढून घालायचा असतो… देवाने प्रत्येक माणसाला आनंदाचं, समाधानाच कवचकुंडल देऊनच पाठवलं आहे… सुखी समाधानी रहाण्याचं रहस्य कळलं की प्रत्येक माणूस आनंदी होईल यात शंका नाही. ही मालिका बघत असताना प्रत्येक माणूस त्याला स्वत:ला, त्याच्या घरतील घटनांना या मालिकेशी जोडू शकेल आणि म्हणूच तर हा आपल्या घराचा आरसा आहे… उगाच हव्यास, मोठेपणा, ईर्षा यामागे सर्वस्व पणाला लावून, आपल्याजवळ असलेल्या सुखापासून दुरावण्यापेक्षा त्या सुखाच्या मृगजळामागे न धावता जे आहे त्यात सुख मानले पाहिजे हे खरं. खरा सुखी माणसाचा सदरा हा प्रत्येकाकडेच आहे, आपल्या माणसांच्या सहवासात आहे, आजीच्या प्रेमात आहे, नात्यांमध्ये आहे… आणि याचीच जाणीव करून देण्यासाठी येत आहे चिमणराव आणि त्यांचे कुटुंब तेंव्हा नक्की बघा आपल्या घराचा आरसा – ‘सुखी माणसाचा सदरा’ २५ ऑक्टोबर रात्री ९.३० वा. आणि २६ ऑक्टोबरपासून सोम ते शनि रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

शुभमंगल ऑनलाईन २६ ऑक्टोबरपासून नव्या वेळेत सोम ते शनि रात्री १०.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

 

Sukhi Manasacha Sadara