स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते, मोलकरीण बाई आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मालिकेच्या शूटिंगचा श्रीगणेशा

कोरोनाच्या संकटामुळे ठप्प असलेली टेलिव्हिजन इंडस्ट्री आता हळू हळू पूर्वपदावर येतेय. स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते, मोलकरीण बाई आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झालीय. शूटिंग सुरू होण्यापूर्वी कलाकारांच्या मेकअप रूम आणि संपूर्ण सेट सॅनिटाईज करण्यात आला. सरकारी सूचनांचं पूर्णपणे पालन करत सेटवर शूटिंगचा श्रीगणेशा करण्यात आला.

कलाकारांसाठी सेट म्हणजे दुसरं घर असतं. तीन महिन्यांपेक्षा जास्त काळानंतर सेटवर पुन्हा हजेरी लावल्यानंतर कलाकारही आनंदात होते.

आई कुठे काय करते मालिकेत आई म्हणजेच अरुंधतीची भूमिका साकारणाऱ्या मधुराणी गोखले प्रभुलकर आपल्या सेटवरच्या कुटुंबाला भेटून भारावून गेल्या होत्या. संपूर्णपणे काळजी घेत आम्ही शूटिंगला सुरुवात केली आहे. लवकरच नव्या भागासह आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला येऊ असं मधुराणी म्हणाली.

मोलकरीण बाई मालिकेत अंबिका ही भूमिका साकारणाऱ्या सुप्रिया पाठारे म्हणाल्या, मी सेट, मेकअप रुम आणि माझ्या सहकलाकारांना खूप मिस केलं. आता शूटला सुरुवात झालीय त्यामुळे आनंद आहे. आम्ही स्वत:ची आणि एकमेकांची काळजी घेत शूटिंग करत आहोत. प्रेक्षकांना पुन्हा भेटण्यासाठी मी उत्सुक आहे अशी भावना सुप्रिया पाठारे यांनी व्यक्त केली.

तेव्हा स्टार प्रवाह वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका पाहण्यासाठी सज्ज व्हा.