ऑनलाईन लग्नाची सुपरफाईन गोष्ट – ‘शुभमंगल ऑनलाईन’ कलर्स मराठीवर !

Shubhmangal Online
ऑनलाईन लग्नाची सुपरफाईन गोष्ट - ‘शुभमंगल ऑनलाईन’ कलर्स मराठीवर ! २८ सप्टेंबरपासून सोम ते शनि रात्री ९.३० वा.

२८ सप्टेंबरपासून सोम ते शनि रात्री ९.३० वा.

म्हणतात ना चित्रातील फूल कितीही सुंदर दिसलं, तरीही त्याचा सुगंध घेता येतो का ? तर नाही… सुगंध घेण्यासाठी फुल हातात असायला हवं, अनुभवता यायला हवं… अगदी तसेच जसे घर पहावे बांधून आणि लग्न पहावे करून… आपल्या संस्कृतीत जीवन म्हणजे अनंत उत्सवांनी नटलेला सोहळा आणि त्यामधील आनंदाचा परमोच्च क्षण म्हणजे “लग्न सोहळा”! ही संकल्पना मुळातच भव्य, आनंददायी… वधू – वर बघण्यापासून ते थेट वधूची पाठवणी होईपर्यंतचा हा थाटामाटात पार पडणारा सोहळा सगळ्यांच्याच आयुष्यातील अविभाज्य भाग…. त्यात लगीनघाई म्हणजे आपल्याकडे जिव्हाळ्याचा विषय… पण, सद्यस्थिति लक्षात घेता तरुण पिढी काय तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील डिजिटलचे महत्व काही औरच होऊनं बसले आहे ! आतापर्यंत  एका व्हिडिओ कॉलवर सार्‍या भेटीगाठी पार पडत, मन जुळत, मैत्री होत असे… पण, ऑनलाईन लग्नाच्या गाठी जुळतील ? एकीकडे वर्‍हाड, नवरा मुलगा एका बेटावर, नवरी मुलगी दुसर्‍याच बेटावर आणि लग्न घडवून आणणारे भटजी तिसर्‍याच स्वतंत्र बेटावर… त्यात हे सगळंच नवे असल्याने वधू – वर यांच्या कुटुंबियांची वेगळीच कुरकुर, हौस पूर्ण नाही करता आली, अमुकच व्यवस्थित पार पडले नाही, मग कुठे नेटवर्कच गेले… असंच काहीसं आपल्या शंतनू – शर्वरीचा आयुष्यात घडणार आहे. शंतनू आणि शर्वरीचे व्हिडिओ कॉलवर भेटीगाठी, बोलण सुरू झालं आणि या दोघांचे हे गोड नातं ऑनलाईनच हळूहळू फुलू लागलं… यानंतर रंगलेला लॉकडाउन दरम्यानचा ऑनलाईन लग्नसोहळा आणि ऑनलाईन लग्नाची तारेवरची कसरत म्हणजे कलर्स मराठीवरील नवीन मालिका ‘शुभमंगल ऑनलाईन’…मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच अशा प्रकारचा लग्नसोहळा रसिक प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. जीवनाचा प्रवाह थांबत नाही हे खरं आहे, तुम्हाला बदलणार्‍या प्रवाहात एकरूप व्हावं लागतं आणि हीच रीत झाली आहे …

 

 

शंतनू आणि शर्वरीचा हा ऑनलाईन लग्न सोहळा कसा पार पडेल ? काय गंमती जमती होतील ? हे बघण्यासाठी तुम्ही देखील सहभागी व्हा या न्यू नॉर्मल, आगळया वेगळ्या लगीनघाईमध्ये… सुबोध भावे (कान्हाज् मॅजिक) निर्मित आणि वैभव चिंचाळकर दिग्दर्शित ‘शुभमंगल ऑनलाईन’ सुरू होत आहे २८ सप्टेंबरपासून सोम ते शनि  रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर. अवघ्या महाराष्ट्राच्या लाडक्या सुकन्या कुलकर्णी – मोने, अमिता खोपकर, सायली संजीव, सुयश टिळक, आनंद इंगळे, मिलिंद फाटक, अंकिता पनवेलकर या मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत असणार आहेत.

लग्नाच्या मंगलाष्टकांमधला *शुभमंगल सावधान* यातला सावधान हा शब्द सध्या अत्यंत महत्वाचा आहे… आणि यालाच लक्षात घेता शंतनू आणि शर्वरीच्या भेटीगाठी ऑनलाईनच सुरू होतात… शंतनू सदावर्ते महत्वाकांक्षी आणि अतिशय देखणा असा एअर लाईनमध्ये काम करणारा आजच्या पिढीतील तरुण आहे. ज्याचा लग्न करण्याला नकार आहे तर शर्वरी अत्यंत हुशार, स्वभावाने मस्त, बिनधास्त, मनमिळाऊ अशी मुलगी आहे… ‘माणूस वाईट नसतो, परिस्थितीमुळे तो तसा वागतो’असे तिचे एकंदरीतच मत आहे… खरंतर दोघांच्या स्वभावातील विरोधाभास गमतीदार आहे आणि हेच त्यांच्या नात्यातील विशेष आहे… शंतनू आणि शर्वरीचे आयुष्य पूर्णपणे बदलते जेव्हा ऑनलाईन भेटीगाठीतून त्यांचे नाते लग्नाच्या महत्वपूर्ण टप्प्यावर येऊन थांबते… आणि मग दोघांच्या घरात एकच लगबग उडते ‘शुभमंगल ऑनलाईन’. एकीकडे लगीनघाई आणि दुसरीकडे शंतनू – शर्वरीची ऑनलाईन डेट चोरून बघणारी घरातील मंडळी… ऑनलाईन लग्न कसे पार पडेल ? काय काय गंमती होतील ? शंतनू – शर्वरीचे नाते कसे फुलत जाईल ? या आगळया वेगळ्या लग्नात अजून काय काय घडेल ? हे बघणे रंजक असणार आहे…

मालिकेबद्दल बोलताना प्रमुख – मराठी टेलिव्हीजन, वायाकॉम18 चे दीपक राजाध्यक्ष म्हणाले, ‘टेलिव्हिजन माध्यम काळासोबत नवं रूप, आकार घेत असतं. प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊन, नवनवे कार्यक्रम देणे आमचे उद्दिष्ट आहे आणि दर्जेदार कार्यक्रम ही कलर्स मराठीची परंपराच आहे… सद्यस्थिती बघता आपल्या सगळ्यांनाच रिफ्रेशिंग, कलरफुल, युथफुल आणि सकारात्मक दृष्टिकोन देणार्‍या गोष्टी बघण्याची नितांत आवश्यकता आहे… शुभमंगल ऑनलाईन या मालिकेद्वारे आम्ही सद्यस्थिति दाखविण्याचा प्रयत्न करणार आहोत… डिजिटल माध्यमांचे महत्व आणि त्यावर नाही म्हटलं तर आजची तरुण पिढी काय आपण देखील काहीना काही कारणास्तव अवलंबून आहोत… जेव्हा लग्नासारखी आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट ऑनलाईन माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला जातो तेव्हा काय घडतं हे बघणे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचे असणार आहे… मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच हा विषय कलर्स मराठीद्वारे दाखवला जाणार आहे.

याचसोबत या मालिकेद्वारे पुन्हा एकदा सुकन्या कुलकर्णी – मोने महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. प्रेक्षकांनी त्यांना बऱ्याच भूमिकांमध्ये पाहिले आहे, त्यांच्यावर भरभरून प्रेमं केल आहे. आम्हाला आशा आहे प्रेक्षक या वेळेसदेखील तसंच प्रेम करतील. सुबोध भावे यांची निर्मिती, आघाडीचे कलाकार, फ्रेश जोडी आणि आताचा विषय यामुळे आम्हाला खात्री आहे की ही मालिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

कार्यक्रमाविषयी बोलताना मालिकेचे निर्माते सुबोध भावे म्हणाले, ‘माणूस एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी नेहमीच वेगवेगळी माध्यमं शोधून काढतो, कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष. प्रेम करणाऱ्या शर्वरी आणि शंतनू यांनीही असंच प्रेमाचं वेगळं माध्यम शोधून काढलं आहे, त्याचीच ही गोष्ट ! या आधी बरेचसे ग्राऊंड एवेंट्स प्रोड्यूस केले, सिनेमा केला ‘पुष्पक विमान’ नावाचा पण मालिका करण्याची ही पहिलीच वेळ आहे. अनेक दिवस मालिकेची निर्मिती करावी अशी ईच्छा होती पण हवी तशी स्क्रिप्ट मिळत नव्हती… लॉकडाऊनच्या काळात शुभमंगल ऑनलाईन या मालिकेची गोष्ट आली, जी आम्हां सगळ्यांना आवडली आणि ती आता प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे २८ सप्टेंबरपासून कलर्स मराठीवर. चांगली टिम जमली आहे दिग्दर्शक, कलाकार आणि पडद्यामागची टिम त्यामुळे उत्सुकता आहे. प्रेक्षकांना आनंद देण्यासाठी उचललेले पाऊल आता त्यांच्यापर्यंत पोहचणार आहे… कलर्स मराठी आणि कान्हाज् मॅजिकचा हा प्रयोग रसिक प्रेक्षकांना नक्की आवडेल.

आपल्या अभिनयाने प्रत्येकाच्या मनामध्ये अबाधित स्थान निर्माण केलेल्या, ज्यांच्यावर प्रेक्षक मनापासून प्रेम करतात अश्या सुकन्या कुलकर्णी मोने या मालिकेविषयी बोलताना म्हणाल्या, ‘घाडगे & सून मालिकेनंतर माई हे पात्र महाराष्ट्र काय तर विदेशामध्ये सुध्दा प्रसिध्द झालं… माई लोकांना आवडायला लागली, प्रत्येक घरात एक माई असावी असं सर्वांना वाटू लागलं. लॉकडाउननंतर कुठल्या प्रकाराच काम येईल, कसं येईल हे प्रश्न मनात आले. पण, त्याच दरम्यान शुभमंगल ऑनलाइन या मालिकेबद्दल विचारणा झाली तेंव्हा मी होकार दिला… जेव्हा मला गोष्ट आणि पात्राबद्दल समजलं तेव्हा मला खूप आनंद झाला… कारण, अनुपमा ही आताची आई आहे, माझ्या वयाची आहे, जी नोकरी करणारी आहे अश्या आईची भूमिका आहे म्हंटल्यावर मी खुश झाले… आमच्या मालिकेची गोष्ट, संवाद, संपूर्ण टीमच खूप अप्रतिम आहे, सगळं जुळून आलं आहे. जशी आम्हाला शूटिंग करताना मज्जा येते आहे तशीच प्रेक्षकांना देखील मालिका बघताना मज्जा येईल अशी आम्हाला खात्री आहे”.

 

शुभमंगल ऑनलाईन मालिकेद्वारे सुयश टिळक आणि सायली संजीव यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे सायली आणि सुयश यांची जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना भेटायला येणार असल्याने दोघांच्या मनामध्ये कुतूहल आहे की प्रेक्षकांना ही जोडी आवडेल का ? ऑनस्क्रीन कसे दिसू ? …

याबद्दल बोलताना सुयश टिळक म्हणाला, ‘खूपच उत्सुक आहे मी कारण लॉकडाऊन नंतरची माझी ही पहिलीच मालिका आहे… गेले काही महिने मी टेलिव्हिजनवर काम करत नव्हतो. पण जेंव्हा या मालिकेबद्दल विचारणा झाली तेंव्हा मी लगेच होकार दिला… ऑडीशन्स, वर्कशॉप्स सगळं ऑनलाईन सुरू होतं त्यामुळे लॉकडाऊननंतर काहीतरी वेगळं करणार आहोत ही भावना मनामध्ये होती. कलर्स मराठीसोबत पुन्हा एकदा मालिका करण्याची संधी मिळते याचा उत्साह आहे, कान्हाज मॅजिक निर्मित ही पहिलीच मालिका आहे आणि मला त्याचा भाग होता आलं याचा देखील आनंद आहे. शुभमंगल ऑनलाईन  मालिकेद्वारे आम्हाला सध्याची गोष्ट सांगायला मिळते आहे ही एक जमेची बाजू आहे, त्याची एक वेगळी मजा आहे आणि प्रेक्षकांना हे बघायला नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे.

पुढे सायली संजीव म्हणाली, ‘कलर्स मराठीसोबत खूप दिवसांपासून काम करायचे होते आणि शेवटी तो क्षण आला आणि त्यामुळे खूप जास्त उत्सुक आहे. दुसरं कारण म्हणजे सायली जशी आहे तशी खूप लोकांना माहिती नाहीये… कुठेतरी शर्वरी आणि सायलीमध्ये खूप साम्य आहे. शर्वरी या पात्राच्या सगळेच प्रेमात पडतील याची मला खात्री आहे कारण मुळातच ते तितकं गोड आहे. खरं सांगायचं तर या मालिकेमुळे माझ्या आयुष्यात खूप सकारात्मकता आली. ही मालिका करण्याची संधी मला मिळाली म्हणून मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते.”

एकदा का एका माणसावर जीव जडला की मग कितीही अडथळे, संकटे मार्गात येवोत माणूस त्यामधून मार्ग काढतोच… मग ते ऑनलाईन भेट ते थेट लग्न का असेना… तसं पाहिलं तर, तंत्रज्ञान आणि लग्न हे दोन काहीही संबंध नसलेले विषय एकत्र बांधले गेले आहेत आणि लग्नाची रंगत वाढत चालली आहे. असंच शंतनू – शर्वरीच्या या प्रवासात घडतं… नेमकं काय घडतं ? कसं घडतं ? त्यांच्या भेटीगाठीपासून ते ऑनलाईन लग्नापर्यंतचा प्रवास नक्की कसा झाला ? हे अनुभवणं नक्कीच खूप गोड आणि मजेशीर असणार आहे… हा प्रवास जरी या दोघांचा असला तरीदेखील त्यांच्या घरच्या मंडळींचा उत्साह, लग्न जमेपर्यंतची त्यांची धडपड, हे जाणून घेण्यासाठी वर्‍हाडी म्हणून आपण सर्व रसिक प्रेक्षक निमंत्रित आहातच २८ सप्टेंबरपासून सोम ते शनि रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर. तेंव्हा नक्की बघा ऑनलाईन लग्नाची सुपरफाईन गोष्ट – ‘शुभमंगल ऑनलाईन’ कलर्स मराठीवर !

याच दिवसापासून ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ ही मालिका रात्री १०.०० वा. प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

Shubhmangal Online
ऑनलाईन लग्नाची सुपरफाईन गोष्ट – ‘शुभमंगल ऑनलाईन’ कलर्स मराठीवर ! २८ सप्टेंबरपासून सोम ते शनि रात्री ९.३० वा.