पुणे, ता. १० :
‘‘आपण सतत लोक काय म्हणतील, याचा विचार करतो. हा विचार सोडून आपल्याला काय योग्य वाटते ते करत रहा. जीवनात निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार, योगासने आणि प्राणायाम महत्त्वाचे आहे. हे केल्यास तुमच्यात होणारे बदल हळूहळू जाणवायला लागतील. मनातील अहंकार, राग विरघळून जाईल आणि मन शांत होईल. स्वत:चा शोध घेण्यासाठी आणि अंर्तमनात डोकवण्यासाठी कोणत्याही प्रकारची योगासने, ध्यानधारणा करा,’’ असा सल्ला देत अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी ‘फिटनेस’चा कानमंत्र दिला. ‘‘दुनिया मे सबसे बडा रोग है, की ‘क्या कहेंगे लोग’, ये रोग का उपचार है ‘योग’’, असे सांगत त्यांनी उपस्थितांचे मन जिंकले.
‘SMG’ आणि ‘वुई आर इन धिस टुगेदर’ मोहिमेअंतर्गत विश्व कल्याणाच्या उद्देशाने आरोग्याचे विविध पैलु उलगडणारा ‘स्वास्थ्यम्’ उपक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमाच्या दुसऱ्या दिवशी शिल्पा यांनी ‘किप इट सिंपल : योग ॲण्ड फिटनेस’ विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी SMG च्या संचालिका मृणाल पवार, संपादक- संचालक श्रीराम पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांनी शिल्पा यांचे स्वागत केले. शिल्पा यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या ‘बाजीगर’ या हिंदी चित्रपटाला पुढील वर्षी ३० वर्षे पूर्ण होत आहेत. याविषयीही त्या भरभरून बोलल्या.
‘‘शाळेत असताना पालकांनी नेहमीच अभ्यासबरोबरच अभ्यासेतर उपक्रमांना महत्त्व दिले. त्यामुळे तेव्हापासूनच भरतनाट्यम्, व्हॉलीबॉल, बास्केट बॉल यात सहभागी होते, तेथूनच ‘फिटनेस’चा प्रवास सुरू झाला. चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, त्यावेळीही मी ‘फिटनेस’ला प्राधान्य दिले,’’ असे सांगत ‘फिटनेस’चा प्रवास कसा सुरू झाला याबद्दल त्यांनी सांगितले.
पुण्यातील आठवणी जागविल्या…
पुण्यातील आठवणींबद्दल शिल्पा म्हणाल्या, ‘‘लहानपणी आई-वडिलांनी काही महिन्यांसाठी पुण्यातील बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवले होते. त्यामुळे मी खूप नाराज होते. म्हणूनच पुण्यातील पहिली आठवण निश्चित चांगली नाही. पण त्यानंतर पुण्यातील आठवणी खूप चांगल्या आहेत. पुण्यातील मिसळ, उसळ हे खाद्यपदार्थ खूप स्वादिष्ट असतात.’’
गरोदरपणानंतर नियंत्रित करा वाढलेले वजन…
गरोदरपणात महिलांचे १५ ते १८ किलो किंबहुना २० किलो वजन वाढले, तरीही ते चालते. परंतु पहिल्या गरोदरपणात माझे वजन तब्बल ३२ किलोंनी वाढले. मुलगा सहा महिन्यांचा होईपर्यंत वजनाकडे फारसे लक्ष दिले नाही, आणि हे सगळ्याच आयां बद्दल होते. तसे माझ्याबाबतही झाले. परंतु या काळात ‘तुझे वजन खूप वाढले आहे’, अशी आठवण सातत्याने करून दिली जात होती. त्यावेळी एका ‘किटी पार्टी’ला गेले असताना ‘ही शिल्पा शेट्टी आहे ना!, किती जाड झाली आहे’, अशी कुजबूज कानावर आली. त्यानंतर पुन्हा एकदा ‘फिटनेस’वर लक्ष केंद्रीत केले. नियमित व्यायाम करून वजन नियंत्रणात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आणि अवघ्या चार महिन्यात ३२ किलो वजन कमी करण्यात यश आले,’’ असा गरोदरपणानंतर वाढलेले वजन नियंत्रणात आणण्याचा प्रवास शिल्पा यांनी अगदी भावूक होऊन सांगितला.
‘‘आपण आयुष्य आपल्या पद्धतीने जगायला हवे. आयुष्य कसे जगावे, हे निवडण्याचा अधिकार आपल्याला आहे. त्यामुळे तुम्ही उठा आणि नव्याने सुरवात करा,’’ असा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला. गरोदरपणानंतर वजन नियंत्रित केले आणि त्यानंतर योगासनांवर डिव्हीडी बनविण्याच्या कामाला सुरवात केल्याचेही त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या,‘‘यु-ट्युब हे वैविध्यपूर्ण माहिती हवी असणाऱ्या प्रेक्षकांशी यशस्वीरित्या नातं जोडण्याचे व्यासपीठ आहे. माझे यु-ट्युबवरील व्हिडिओ पाहून १०-१२ वर्षांची मुलं ‘आंटी तुमची ही पाककृती खूप चांगली आहे’, अशी प्रतिक्रिया देतात, त्यावेळी समाधान वाटते. याद्वारे फिटनेस आणि आरोग्यदायी आहाराबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.’’
झोपताना मोबाईल जवळ नको…
‘‘कोरोना काळात सगळ्यांनी अनेक गोष्टी, माणसे गमावली आहेत. त्यामुळे मनावर प्रचंड ताण आलेला आहे. या सगळ्यात तंत्रज्ञानाचे व्यसन जडले आहे. मोबाईलची साधी एक रिंग वाजली तरीही आपले सगळे लक्ष तिकडे एकवटते. आपण ‘उद्या काय होईल’, ‘मुलांचे शिक्षण कसे होईल, त्यांचे करिअर कसे असेल’, अशा भविष्यातील गोष्टींचा विचार सतत करतो. त्यात आपण आजचे जगणेच हरवून जातो,’’ अशी खंत शिल्पा यांनी व्यक्त केली. ‘‘मोबाईलच्या व्यसनामुळे अनेकजण रात्री झोपताना डोक्याजवळ मोबाईल चार्जिंगला लावून झोपतात. मोबाईलच्या रेडिएशनचा अतिशय विपरित परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो, हे जगभरात वेगवेगळ्या संशोधनाद्वारे सिद्ध झाले आहे, परंतु त्याकडे दुर्लक्ष करतो. याद्वारे आपण दररोज हळूहळू मरणाला जवळ करत आहोत. घरात लहान मुले असतील, तर ती झोपताना त्याच्याजवळ मोबाईल ठेवू नका,’’ असेही त्यांनी आवर्जुन सांगितले.
शिल्पा शेट्टी यांच्या ‘फिटनेस’चा मंत्र :
– आठवड्यातून किमान चार वेळा व्यायाम करणे
– आठवड्यातून किमान पाच वेळा प्राणायाम करणे
– दर रविवार हा ‘चीट डे’ असतो. केवळ याचदिवशी हवे ते पदार्थ मनसोक्त खाण्याचा आनंद लुटते.
– गेल्या अनेक वर्षांपासून अष्टांग योग साधना करते.
………..
मान्यवरांकडून गिरवून घेतले ‘प्राणायाम’चे धडे…
‘‘श्वसनावर नियंत्रण मिळविले, तर तुमचे जीवन नियंत्रित ठेवता येते. असे झाल्यास तुमची शक्ती वाढते. त्यातून सकारात्मक दृष्टीकोन ठेवून योग्य निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यात विकसित होते. त्यामुळे ‘प्राणायाम’ करण्यासाठी आवर्जून वेळ द्या. तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा,’’ असा सल्ला देत शिल्पा यांनी कार्यक्रमाच्या उत्तरार्धात तब्बल २० ते २४ मिनिटे ‘प्राणायाम कसे करावे’ याचे प्रात्यक्षिक दाखविले. श्वास आत घेताना चांगले विचार, सकारात्मकता अंतर्मनात घ्यावी आणि चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवावे आणि श्वास सोडताना मनातील नकारात्मकता, वाईट गोष्टी सगळं बाहेर काढावं, असे त्यांनी सूचविले. अनुलोम, विलोम, कपालभाती, उज्जायी हे प्राणायामचे प्रकार शिकवले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘ओमकार’ आणि चक्र संकल्पनेबाबत त्यांनी सांगितले. एवढंच नव्हे तर प्रेक्षकांना ‘ओमकार’ कसे म्हणायचे आणि मुलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र, सहस्त्रार चक्र या संकल्पना प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितल्या.
…..
शिल्पा शेट्टी यांनी दिलेल्या टिप्स :
१. तुम्ही कामात कितीही व्यग्र असा, पण स्वत:साठी वेळ द्या. स्वत: आनंदी असाल, तरच दुसऱ्याला आनंद देऊ शकणार आहात.
२. प्रत्येक श्वास घेताना सकारात्मक विचार आणि दृष्टीकोन मनात येऊ देत, श्वास सोडताना सर्व नकारात्मकता बाहेर टाकावी.
३. मोबाईलच्या रेडिएशनचा आरोग्यावर घातक परिणाम होत असतो. त्यामुळे कधीही झोपताना मोबाईल सोबत ठेवू नका.
४. योगासने करायला वेळ नसेल, तर निदान प्राणायाम करायलाच हवा.
५. लोक काय म्हणतील, याचा विचार कधीही करत बसू नका.
६. नागरिक खूप जास्त व्यायाम करतात आणि त्यानंतर बर्गर खातात. त्यापेक्षा आरोग्यदायी आहार घेणे महत्त्वाचे आहे.
७. जीवनात ७० टक्के आरोग्यदायी सकस आहारावर लक्ष द्या; उर्वरित ३० टक्के हे योगासने, जीम, व्यायाम यासाठी द्यावेत.
८. तुम्ही सुंदर दिसणे हे महत्त्वाचे नाही, तर तुम्ही निरोगी असणे गरजेचे आहे.
९. एका रात्रीत तुम्ही ‘फिट’ होणार नाही, तर तुम्हाला त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतील.
१०. तुमचे शरीर हे वाहन असून तुमचे मन हे चालक आहे, त्यामुळे मनाचे आरोग्य जपा.