फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील शुभम-कीर्तीने कठपुतळी बाहुल्यांचा वेष धारण करत दिला स्वच्छता राखण्याचा संदेश
स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतून मनोरंजनासोबतच प्रबोधन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. घर आणि घराचा परिसर स्वच्छ ठेवा ही गोष्ट आपल्याला लहानपणापासूनच शिकवण्यात येते. घर स्वच्छ ठेवलं जातं मात्र बऱ्याचदा घरातला कचरा रस्त्यावरच फेकला जातो. घरासोबतच परिसराची स्वच्छता किती महत्त्वाची आहे हे सांगणारा प्रसंग नुकताच ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेमध्ये चित्रित करण्यात आला. शुभम आणि कीर्तीने कठपुतळी बाहुल्यांच्या रुपात स्वच्छतेचं महत्त्व सर्वांना पटवून दिलं. कचरा रस्त्यावर न टाकता कचरापेटीत टाकायला हवा याचा धडा सर्वांना अनोख्या पद्धतीने दिला.
मालिकेतल्या या नव्या प्रयोगाविषयी सांगताना शुभम ही व्यक्तिरेखा साकारणारा हर्षद अतकरी म्हणाला, ‘मराठीत आजवर असा प्रयोग झालेला नाही. पहिल्यांदाच अश्या पद्धतीचा ट्रॅक शूट करण्यात आला आहे. हा सीन शूट करण्यासाठी खास कोरिओग्राफरला बोलावण्यात आलं होतं. या पूर्ण सीनची कोरिओग्राफी करण्यात आली. मी आणि समृद्धीने सराव करुन हा सीन केला. या सीनच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्यात आला ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे असं मला वाटतं.’
कीर्तीची भूमिका साकारणारी समृद्धी या खास सीन बद्दल सांगताना म्हणाली, ‘मला नृत्याची आवड आहे. या सीनच्या निमित्ताने माझी आवड आणि सीन असा सुवर्णयोग जुळून आला होता. शूटिंगच्या दिवशी सेटवर माहोलच वेगळा होता. स्वच्छता राखा ही गोष्ट आम्ही वेगळ्या पद्धतीने सादर केली. सीन करताना खूपच मजा आली. तेव्हा पाहायला विसरु नका फुलाला सुगंध मातीचा दररोज रात्री ८.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.’