एक आगळं-वेगळं नाटक “Knock Knock सेलिब्रिटी”

एक आगळं-वेगळं नाटक "Knock Knock सेलिब्रिटी"

मराठी नाट्यसृष्टीत आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या नानाविध कलाकृती सादर झाल्या आहेत. एखाद्या विषयाच्या वेगवेगळ्या पैलूंना नाविन्याने सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हे आपल्या मराठी नाट्यसृष्टीचे वैशिष्ट्य आहे. अशाच एका वेगळ्या विषयावर knock करणारं नाटक म्हणजेच ओंकार कुळकर्णी लिखित आणि मंदार देशपांडे दिग्दर्शित Knock Knock Celebrity. विप्लवा आणि प्रवेश निर्मित संतोष रत्नाकर गुजराथी यांनी सादर केलेल्या ह्या नाटकाची निर्मिती संतोष गुजराथी, मनोज पाटील, आणि विजय केंकरे ह्यांनी केली आहे आणि ह्या नाटकाला तितक्याच ताकदीने आपल्या अभिनयाद्वारे सादर करण्याची जबाबदारी लीलया पेलली आहे ती सुमीत राघवन आणि नेहा जोशी ह्यांनी.

Knock Knock Celebrity Marathi Play
ओंकार कुळकर्णी यांनी आपल्या लिखाणाद्वारे सेलिब्रिटी आणि प्रेक्षक यांच्यातील नात्यावर प्रकाश टाकला आहे. प्रेक्षकांच्या दृष्टीने असलेले सेलेब्रिटीचे आयुष्य किती भव्य-दिव्य, वेगळे असते. प्रेक्षकांसाठी सेलेब्रिटी जे काही सादर करतात, जे ही पात्र साकारतात तेच होऊन जातात. पण हे सारे करत असताना सेलेब्रिटी ही पण एक व्यक्तीच असून त्याचे ही काहीतरी स्वतंत्र आयुष्य असू शकते याकडे दुर्लक्ष होते का ? सतत प्रेक्षकांसाठी जगताना त्याला त्याच्याही अस्तित्वाचा विसर पडत असेल का ? असेच काहीसे वेगळेपण घेऊन आपल्या समोर नेहा जोशी आणि सुमीत राघवन Knock Knock Celebrity हे नाटक घेऊन आले आहेत. सुमीत राघवन आणि नेहा जोशी या दोन्ही कलाकारांनी आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या भूमिकांची मेजवाणी आपल्यासमोर सादर करून आपले मनोरंजन केले आहे. कोणतीही भूमिका ते तितक्याच सहजतेने साकारतात. यापूर्वी कधीही न पाहिलेल्या छटांमध्ये त्यांना पाहण्यासाठी हे नाटक नक्की बघावे. आपल्या आवडत्या कलाकारांचे एक आगळे-वेगळे रूप या नाटकातून निश्चितच प्रेक्षकांना बघायला मिळेल.


प्रदीप मुळ्ये यांच्या नेपथ्य आणि प्रकाश योजनेमुळे आपल्या समोर सगळी दृष्य तितक्याच सुंदर रितीने उभी राहतात आणि ह्या सगळ्यांना अधिक खुलवते ते म्हणजे राहुल रानडे यांचे प्रत्येक प्रसंगाला न्याय देणारे संगीत. श्वेता बापट यांनी या नाटकात कलाकारांच्या वेशभूषेची धुरा सांभाळली असून त्यास त्यांनी योग्य न्याय दिला आहे.
प्रत्येक नाटकातील खूप महत्वाचा भाग म्हणजे त्या नाटकाचे संवाद. या नाटकात स्वगताच्या माध्यमातून नाटकाचे मर्म प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी लेखक ओंकार कुळकर्णी यांनी उत्तमरित्या पार पाडली आहे ; आणि ह्या सगळ्या मोत्यांना एका माळीत गुंफून आपल्या दिग्दर्शनाने त्यांना योग्य व बहारदार दिशा देण्याचे शिवधनुष्य पेलले आहे मंदार देशपांडे ह्यांनी. नाट्यप्रयोगातील एक आगळा-वेगळा अनुभव घेण्यासाठी Knock Knock Celebrity हे नाटक नक्की बघा.