स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘अबोली’मध्ये लवकरच एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. या मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री अक्षया हिंदळकरची दमदार एन्ट्री होणार असून, ती पहिल्यांदाच खलनायिकेच्या भूमिकेत झळकणार आहे.
‘साता जल्माच्या गाठी’ आणि ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ यांसारख्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अक्षया जवळपास चार वर्षांनंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाहवर झळकणार आहे. यावेळी ती ‘सुप्रिया नागरगोजे’ या पात्राच्या भूमिकेत दिसणार आहे.
सुप्रिया ही आपली जुळी बहिण पौर्णिमाच्या मृत्यूमागचं खरं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहे. तिच्या मते, पौर्णिमाचा मृत्यू गॅस सिलिंडरच्या अपघातात झाला नसून तो एक योजनाबद्ध खून आहे, ज्यामागे पौर्णिमाचे सासू-सासरे आहेत. मात्र तिच्याकडे हे सिद्ध करण्यासारखा कोणताही ठोस पुरावा नाही. म्हणूनच ती अबोलीकडे मदतीसाठी येते, कारण तिला वाटतं की अबोलीच आपल्या बहिणीसाठी न्याय मिळवू शकते.
पण सुप्रिया जितकी आक्रमक आणि वाचाळ आहे, तितकीच अबोली शांत आणि विचारपूर्वक निर्णय घेणारी. त्यामुळे सुरुवातीला अबोलीला तिच्या बोलण्यावर विश्वास बसत नाही. आता सुप्रिया आपल्या बहिणीला न्याय मिळवून देऊ शकेल का? अबोली तिची मदत करेल का? हे पाहणं रंजक ठरणार आहे.
तर हा नवा ट्विस्ट पाहायला विसरू नका ‘अबोली’मध्ये, दररोज रात्री ११ वाजता, फक्त स्टार प्रवाहवर.