पौराणिक मालिकेत भूमिका साकारण्याची पहिलीच वेळ
‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. दख्खनच्या राजाचं विशाल रुप प्रेक्षकांच्या भेटीला आलंच आहे. त्याचबरोबर मोठ्या यमाई आणि चोपडाईचं दर्शन देखिल प्रेक्षकांना होत आहे. अभिनेत्री ऐताशा संझगिरी या मालिकेत यमाईच्या रुपात दिसत असून पौराणिक मालिकेत भूमिका साकारण्याची ऐताशाची पहिलीच वेळ आहे.
ऐताशाने याआधी स्टार प्रवाहच्याच छोटी मालकीण या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. यमाई साकारण्याच्या अनुभवाविषयी ऐताशा म्हणाली, ‘माझ्यासाठी हा खरंच खूप वेगळा अनुभव आहे. यमाई म्हणजे रेणुका देवीचा अवतार. धाडसी आणि प्रचंड आत्मविश्वासू अशी भूमिका मला यमाईच्या निमित्ताने साकारायला मिळत आहे. कोल्हापूरच्या चित्रनगरीत आमच्या मालिकेचं शूटिंग सुरु आहे. खरतर आमचे आऊट डोअर सीन खूप असल्यामुळे सेटचा वापर खूप कमी होतो. त्यामुळे कोल्हापूरच्या निसर्गरम्य वातावरणात शूट करण्याचा आनंद काही औरच आहे. माझा लूकसुद्धा वेगळा आहे. नऊवारी साडी, पारंपरिक दागिने आणि डोक्यावरची चिरी अश्या पद्धतीने मी यमाईच्या व्यक्तिरेखेसाठी सज्ज होते. माझ्यासाठी यमाई साकारणं हा समृद्ध करणारा अनुभव आहे.‘
‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेच्या निमित्ताने रसिकांपर्यंत प्रामाणिक मनोरंजनाद्वारे त्यांच्या आराध्य दैवताचं दर्शन आणि त्या दैवताच्या आयुष्यातील माहित असलेले आणि काही नव्याने कळतील असे पैलू या मालिकेद्वारे मांडण्यात येत आहेत. त्यासाठी न चुकता पाहा ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ दररोज सायंकाळी ६.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.