“मराठी इंडस्ट्रीतील बेस्ट फ्रेण्ड्स अमृता खानविलकर आणि अक्षय बर्दापूरकर घेऊन आले आहेत ‘प्लॅनेट टी’”
अभिनेत्री अमृता खानविलकर ही सुंदर तर आहेच पण ती मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीतील तिची दोन्ही कामं आणि जबाबदाऱ्या अगदी उत्तमरीत्या सांभाळते. अमृता खानविलकरशी संबंधित एक महत्त्वाची गोष्ट गेले काही दिवस गुलदस्त्यात होती. अमृता नेमकी कोणत्या गोष्टीची घोषणा करणार आहे याची उत्सुकता अनेकांच्या मनात होती. आणि सरप्राईज बॉक्समध्ये नेमके काय होते हे आता सर्वांनाच कळले आहे. स्वत:चं काही तरी नवीन सुरु करावं ज्याचा फायदा अनेकांना होऊ शकतो असं प्रत्येकाला वाटतं आणि असाच विचार अमृताच्या देखील मनात आला. आणि मनात आलं की ते करायचंच अशी विचारसरणी असणाऱ्या धाडसी अमृताने प्लॅनेट मराठीसोबत स्वत:ची आर्टिस्ट मॅनेजमेंट कंपनी चालू केली ज्याचे नाव आहे ‘प्लॅनेट टी’.
मराठी इंडस्ट्रीतील बेस्ट फ्रेण्ड्सच्या जोडींमध्ये अमृता खानविलकर आणि प्लॅनेट मराठीचे प्रमुख अक्षय बर्दापूरकर यांच्या जोडीचा देखील उल्लेख हमखास केला जातो. अमृता आणि अक्षय यांनी मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीला नजरेसमोर ठेवून महाराष्ट्रात लपलेले टॅलेंट जगभर प्रसिद्ध करण्याच्या हेतूने ही कंपनी सुरु करण्यात आली आहे.
याविषयी अमृता म्हणते की, “महाराष्ट्रात प्रचंड टॅलेंट लपलेले आहे जे योग्य त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे मग ते टॅलेंट हिंदी असो वा मराठी. लोकांमध्ये टॅलेंट आहे पण त्यांना योग्य दिशा मिळत नाही किंवा त्याचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहचत नाही. त्यांच्याकडे अशा काही संस्था किंवा माध्यमं नाहीत ज्यामुळे त्यांचं टॅलेंट जगभर पोहोचवले जाईल. जेव्हा मी अक्षयला भेटले तेव्हा मला समजलं कि त्याने पूर्वी इव्हेंट मॅनेजमेंटची कामं पाहिली आहेत. आम्ही एकत्र येऊन या पार्श्वभूमीवर काम करण्याचे ठरवले जेणे करून आम्ही लोकल टॅलेंटला जागतिक दर्जा देऊ शकू. आम्हाला युवा कलाकार, उत्तम लेखक, दिग्दर्शक ज्यांच्या मध्ये तो X फॅक्टर आहे त्यांना जगभर प्रसिद्धी मिळवून देण्याचे काम करायचे आहे.”
तसेच अक्षय यांनी देखील या नवीन कार्याविषयी व्यक्त होताना म्हटले की, “‘प्लॅनेट टी’ ही अमृताची कल्पना होती. माझी डिजिटल प्लॅटफॉर्मशी संबंधित कामं जास्त आहेत, त्यात मी सध्या काही फिल्म्स करत आहे आणि मनोरंजन क्षेत्रात काम करत असताना मागच्या काही वर्षात अनेक कामांचा अनुभव देखील माझ्या सोबतीला आहे. मला असं वाटत होतं की आता ती वेळ आली आहे कि अजून पुढे जाऊन काही तरी नवीन करायला हवे.”
अमृता आणि अक्षय यांच्या ‘प्लॅनेट टी’ या आर्टिस्ट मॅनेजमेंट कंपनीमुळे टॅलेंट असणाऱ्या अनेक व्यक्तिंना महत्त्वाचा आधार मिळणार आहे. तर मग जर तुमच्यात तो X फॅक्टर असेल तर तुम्हाला कळलंच असेल कोणाला संपर्क करायला पाहिजे.