स्टार प्रवाहवर ५ जुलैपासून ‘एक टप्पा आऊट’ हा नवा कॉमेडी शो सुरु झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून अस्सल विनोदवीरांचा शोध या कार्यक्रमातून घेतला जाणार आहे. महाराष्ट्रात दडलेल्या या हिऱ्यांना पैलू पाडण्याचं काम करत आहेत कॉमेडीचा बादशाहा जॉनी लीवर आणि मराठीतले दोन दिग्गज कलाकार अर्थातच निर्मिती सावंत आणि भरत जाधव. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्याशी साधलेला हा खास संवाद
- निर्मिती ताई ‘एक टप्पा आऊट’ या कार्यक्रमाचं वेगळेपण काय सांगाल?
- निर्मिती सावंत : स्टॅंडअप कॉमेडी आणि थक्क करायला लावणारं स्पर्धकांचं टॅलेंट हे या शोचं वेगळेपण म्हणता येईल. एकतर बरीच वर्ष आपण फक्त स्किट्स बघत आलोय. खूप दिवसांनंतर आपण स्टॅंडअप कॉमेडी पहाणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टॅंडअप कॉमेडीचा बादशहा जॉनी लिवर आणि महाराष्ट्राला खळखळून हसवणारा अभिनेता भरत जाधव हा शो जज करणार आहेत. त्यामुळे या शोसाठी जेव्हा जज म्हणून विचारणा झाली तेव्हा मी लगेचच होकार कळवला. या शोच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातलं टॅलेंट एकाच मंचावर येणार असल्यामुळे प्रेक्षकांसाठी अनोखी पर्वणी असेल.
- स्पर्धकांविषयी काय सांगाल ? त्यांना काही खास टिप्स दिल्या आहेत का?
- निर्मिती सावंत : ‘एक टप्पा आऊट’च्या निमित्ताने मला खूप गोष्टी शिकायला मिळत आहेत. मी अपग्रेड होतेय असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. स्पर्धकांचा उत्साह आणि टॅलेंट खरोखर थक्क करणारं आहे. या कार्यक्रमाचा पहिला भाग शूट झाला आहे. हा भाग प्रत्यक्ष जज केल्यानंतर हा शो स्वीकारण्याचा माझा निर्णय योग्य होता असं मला वाटतंय. प्रत्येक स्पर्धकाची वेगळी अशी खासियत आहे. आंबटगोड मालिकेनंतर खूप वर्षांनी स्टार प्रवाह सोबत काम करतेय याचा प्रचंड आनंद आहे. एपिसोडच्या पहिल्या दिवशी स्टार प्रवाह कडून खूप छान स्वागत करण्यात आलं. हा जिव्हाळा आणि प्रेम असाच कायम राहो हीच इच्छा व्यक्त करेन.
- जॉनी लीवर, भरत जाधव आणि निर्मिती ताई एकत्र एका मंचावर आल्यावर सेटवर नेमकी काय धमाल घडते?
- निर्मिती सावंत : आम्हा तिघांचीही खूप छान गट्टी जमलीय. प्रत्येक स्कीटनंतर जॉनीभाई जे कमेंट्स देतात तेव्हा कमेंट्स सोबतच काहीतरी परफॉर्म करुन दाखवतात जे मला खूप आवडतं. सेटवरचं वातावरणच बदलून जातं. त्यामुळे या शोला खूप वेगळी लज्जत आलीय. आतापर्यंत जॉनी भाईंना आपण वेगवेगळ्या सिनेमांमधून, कार्यक्रमांमधून पाहात आलोय. विनोदाच्या बादशहाला आता ‘एक टप्पा आऊट’मधून भेटणं म्हणजे पर्वणी असेल.
- ‘एक टप्पा आऊट’ हे नावंही खूप वेगळं आहे. त्याविषयी…
- निर्मिती सावंत : हो खरंय. क्रिकेटचा फिव्हर सध्या सगळीकडेच आहे. या फिव्हरमध्ये अगदी चपखल बसणारं हे नाव आहे. नवख्या स्पर्धकांना एका योग्य संधीची गरज असते. स्टार प्रवाह वाहिनीने हे व्यासपीठ त्यांना उपलब्ध करुन दिलंय. त्यामुळे या संधीचा पुरेपुर फायदा करुन घ्यावा असं दर्शवणारं एक टप्पा आऊट हे अगदी योग्य नाव आहे असं मला वाटतं. तेव्हा पाहायला विसरु नका नवा कॉमेडी शो ‘एक टप्पा आऊट’ शुक्रवार ते रविवार रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाह वर.