इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्नतर्फे (आयएफएफएम) बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरला ह्या वर्षीचा प्रतिष्ठेचा डिसरप्टर ऑफ द इयर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
भूमी पेडणेकर या तरुण आणि अफाट प्रतिभेच्या बॉलिवूड अभिनेत्रीने नेहमीच तिच्या प्रभावी अभिनयाने आणि प्रत्येक व्यक्तिरेखेतील अस्सलतेने प्रेक्षकांना मोहित केले आहे. कोणत्याही प्रकारच्या भूमिकेतील अविश्वसनीय कामगिरी आणि आजवर केलेल्या प्रत्येक फिल्ममधील दर्जेदार अभिनय ह्यांमुळे तिला तिच्या पिढीतील सर्वोत्तम अभिनेत्रींमध्ये गणले जाते. दम लगा के हैशा या तिच्या पहिल्या फिल्म मध्ये तिने नायिकेच्या साच्यात न बसणारी भूमिका केली होती. त्यानंतरही बधाई दो, डॉली किटी और वह चमकते सितारे, टॉयलेट: एक प्रेमकथा अशा अनेक सामाजिक विषय हाताळणाऱ्या फिल्म्स भूमीने केल्या आहेत. रुढींना आव्हान देणाऱ्या आणि सहसा दुर्लक्षित असलेल्या गोष्टी प्रकाशात आणणाऱ्या व्यक्तिरेखांची निवड ती सातत्याने करत आली आहे. गेल्या 7 वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीत काम करत असलेल्या भूमीला तिच्या अभिनयासाठी 26 पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळे देशातील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी ती एक आहे.
सर्जनशीलता आणि सांस्कृतिक आदानप्रदानाचा संयोग घडवून आणणाऱ्या सोहळ्यामध्ये भूमीने सिने विश्वाला दिलेल्या अपवादात्मक योगदानाची तसेच, प्रभावी भूमिकांच्या व विचारांना चालना देणाऱ्या अभिनयाच्या माध्यमातून परंपरांना आव्हान देण्याची तिची क्षमता ह्यांची दखल घेण्यात आली.
भूमी पेडणेकर ह्याबाबत म्हणाली, “आयएफएफएममध्ये ‘डिसरप्टर ऑफ द इयर’ हा पुरस्कार स्वीकारताना मला खूपच सन्मानित झाल्यासारखे आणि भारावून गेल्यासारखे वाटत आहे. ह्या पुरस्काराच्या रूपाने मिळालेली मान्यता माझ्यासाठी अत्यंत सुखद आहे. कारण, मी सरधोपट रस्त्यावर कधीच चालले नाही. हा पुरस्कार माझ्या कामावर शिक्कामोर्तब करणारा आहे. सातत्याने अडथळे दूर करत राहण्यातील तसेच सद्यस्थितीला आव्हान देत राहण्यातील शक्ती ह्यातून दिसून येते. त्याचा परिणामही नक्कीच होतो हे ह्यातून दिसून येते. मी आजवर केलेल्या प्रत्येक फिल्मचा मला अभिमान वाटतोच पण ‘बधाई दो’चा मला जास्त अभिमान वाटतो, कारण, ह्या फिल्मच्या माध्यमातून मी भारतातील एलजीबीटीक्यूआयए+ समुदायाला पाठिंबा देऊ शकले.”
अडथळे मोडून काढण्याचे आणि फिल्म इंडस्ट्रीच्या सीमा विस्तारण्याचे धैर्य दाखवणाऱ्या व्यक्तीला आयएफएफएममध्ये डिसरप्टर ऑफ द इयर हा पुरस्कार दिला जातो. भूमी पेडणेकरचा मनोरंजनाच्या क्षेत्रातील प्रवास हा लक्षणीय आहे. केवळ प्रेक्षकांना आपल्याशा वाटणाऱ्या नव्हे तर समाजातील लक्ष दिले जाणे आवश्यक आहे अशा समस्यांवरील संवाद चेतवणाऱ्या भूमिकांची निवड हे ह्या प्रवासाचे वैशिष्ट्य आहे.
भूमी पेडणेकर म्हणाली, “एक डिसरप्टर म्हणून मी नेहमीच शक्यतांकडे नव्या दृष्टीने बघण्याचा, साचे मोडण्याचा आणि समावेशकतेच्या माध्यमातून बदलासाठी नवीन मार्ग खुले करण्याचा प्रयत्न केला आहे. हा पुरस्कार म्हणजे माझ्या या प्रवासाचा गौरव नाही, तर वेगळी स्वप्ने बघण्याचे धैर्य दाखवणाऱ्या आणि जगात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व निर्भय व्यक्तींना ते वंदन आहे.”
ह्या पुरस्काराच्या माध्यमातून भूमी पेडणेकरची सिनेमाच्या विश्वातील चाकोरी मोडणारी (डिसरप्टर) ही प्रतिमा तर आणखी दृढ झाली आहेच, शिवाय, फिल्म्सच्या माध्यमातून समाजाच्या विचाराला आकार देणारा तसेच सद्यपरिस्थितीला आव्हान देणाऱ्या भवितव्याचा मार्गही ह्यातून मोकळा होणार आहे.