तरुणाईचा आवाज : आरजे सोहम !

RJ Soham
तरुणाईचा आवाज : आरजे सोहम !

तरुणाईने योग्य वयात स्वतःला वेळ दिला, आपल्या क्षमता ओळखल्या तर त्यांना स्वतःतील वेगळा आवाज ऐकू येतो आणि स्वतःचे ध्येय ठरवणे सोपे होते हे आरजे सोहमने सिद्ध केले आहे. तो सध्या ‘ ९४.३ माय एफएम ‘ चा प्राईम टाइम आरजे आहे. वयाच्या विसाव्या वर्षी सोहम एक आरजे आहे. क्रिकेट कंमेंटेटर आहे. मोटिव्हेशनल स्पीकर आहे. तो महाराष्ट्रातील ‘ वन ऑफ द मोस्ट फॉलोड आरजे ‘ आहे.

याचे इंस्टाग्रामवरील तरुणाईला प्रेरणा देणारे व्हिडीओ खूप व्हायरल होत आहेत. या व्हिडीओजमध्ये तो आपल्या कमतरतांवर मात करून ध्येय साध्य करणाऱ्या व्यक्तींची ओळख तरुणाईला करून देतो. सोहमच्या व्हिडिओची त्याचे फॅन्स वाट बघत असतात. त्याचे कमेंट बॉक्स भरून वाहत असते. या प्रवासाची सुरुवात तो सहावीत असतांना झाली. सहावीत शिकत असताना त्याने पहिली क्रिकेट कॉमेंट्री केली. त्याला क्रिकेट खेळण्याचा छंद होता. दूरदर्शनवर क्रिकेटची मॅच लागली की तो टीव्हीचा आवाज बंद करून स्वतःच कॉमेंट्री करून पाहायचा प्रयत्न करायचा. त्याच्या पालकांनी एकदा त्याचा हा प्रयोग पाहिला आणि त्यांनी त्याच्यातल्या या वेगळ्या क्षमतेला खतपाणी घातले आणि सोहमची क्रिकेट कंमेंटेटर म्हणून जर्नी सुरु झाली. त्याने रणजी सामन्यांसह ६०० पेक्षा जास्त क्रिकेटच्या मॅचेसची कॉमेंट्री केली आहे.

सोहम मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून तरुणाईमध्ये ओळखला जातो. तरुणाने तरुणांशी साधलेला तो संवाद असल्याने तरुण पिढी त्याच्या सेमिनारशी लगेच जोडली जाते. वयाच्या विसाव्या वर्षी मी हे करू शकलो. तुम्हीही करू शकाल. त्यासाठी स्वतःला वेळ द्या, स्वतःतील क्षमता शोधा. स्वतःवर विश्वास ठेवा. ध्येय ठरवा आणि ते साध्य होईपर्यंत प्रयत्न थांबवू नका हे तो तरुणाईला पटवून देतो.