देशाच्या स्वास्थ्यासाठी अलका कुबल यांनी काळुबाई आईला घातले साकडे आणि केला नवस

संपूर्ण जगावर ओढवलेले कोरोनाचे संकट कायमस्वरूपी दूर करण्यासाठी चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने देवीच्या वाराच्या दिवशी, म्हणजेच शुक्रवारी अभिनेत्री अलका कुबल यांनी मांढरदेवच्या काळुबाईला साकडे घातले आहे.

सातारा जिल्ह्यातील मांढरदेव येथील नवसाला पावणार्‍या काळुबाईदेवीचे पुरातन मंदिर हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या तसेच कर्नाटक व आंध्र प्रदेशातल्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान. यंदाच्या वर्षी जानेवारी महिन्यात शाकंभरी पौर्णिमेला मांढरदेवी यात्रेला उत्साहाने सुरुवात झाली होती आणि ‘काळुबाईच्या नावानं चांगभलं’च्या गजरात अनेक भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. परंतु यात्रेनंतर पुढील दोन महिन्यांतच कोरोना नावाचे संकट संपूर्ण जगासमोर ठाणण मांडून उभे राहिले आणि यातून सुखरूपपणे सर्वांची सुटका व्हावी, देवीचा आशीर्वाद पाठीशी सतत भक्कमपणे राहावा यासाठी अलका कुबल यांनी काळुबाईला नवस केला आणि साकडे घालत म्हटले की “कोरोनाच्या संकटातून मनुष्यजातीला वाचव आई काळुबाई, मी स्वतः मांढरदेवला येऊन खणानारळाने तुझी ओटी भरेन.”

या संकटाशी दोन हात करायला सर्व क्षेत्रांतील सर्व कुशल मंडळी त्यांचे पूर्ण प्रयत्न करत आहेत. विज्ञान, तंत्रज्ञान फार प्रगत झाले आहे…पण युक्तीला भक्तीची आणि शक्तीची जोड असेल, तर तिची ताकद अधिक वाढते. शास्त्र आणि विज्ञान एकत्रच काम करत असतात, आपण माणसांनी देव आणि इतर गोष्टी असा भेदभाव निर्माण केला आहे. जसे विज्ञान श्रेष्ठ आहे, तसेच देव किंवा आध्यात्मिक शक्तींमध्येदेखील ताकद आहे. ही सध्याची परिस्थिती सुधारावी म्हणून आपणही स्वत:हून किंवा कधीकधी नकळतपणे प्रार्थना करत असतो.

देव त्याचे अस्तित्व जाणवून देतोय माणसांमधून… देवळात दिसणारा देव आता डॉक्टर्स, नर्सेस, आपल्या काळजीपोटी रस्त्यावर उतरलेली पोलीस यंत्रणा, गरिबांना दोन वेळचे अन्न मिळवून देण्यासाठी धडपड करणारी माणसे या सगळ्यांमध्ये देव दिसतो आहे.

आई काळुबाईची कृपा होईल, आई या संकटातून सर्वांना सुखरुपपणे बाहेर काढेल या विश्वासाने आणि श्रध्देने, अलका कुबल यांनी साकडे घातले आहे आणि सर्वांनी आपापली काळजी घ्यावी अशी विनंती देखील त्यांनी केली आहे.

 

Alka Kubal Aathalye Prays To God For The Cure Against Corona Virus
“कोरोनाच्या संकटातून मनुष्यजातीला वाचव आई…” म्हणत अलका कुबल यांनी आई काळुबाईला घातले साकडे